शेतकर्‍यांना पीक विम्याची रक्कम न देणार्‍या सहा बँक व्यवस्थापकांविरोधात गुन्हे

रावेर : केळी फळ पीक विम्याची रक्कम शेतकर्‍यांना न देणार्‍या रावेर तालुक्यातील चार तर मुक्ताईनगरातील दोन अशा सहा बँकेच्या व्यवस्थापकांविरोधात शुक्रवारी कृषी विभागाने गुन्हे दाखल केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी वारंवार निर्देश दिल्यानंतर दुर्लक्ष करण्यात आल्याने संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.

यांच्या विरोधात दाखल झाले गुन्हे
रावेर तालुका कृषी अधिकारी मयूर भामरे यांनी खानापूर सेंट्रल बँकेचे तत्कालीन शाखा व्यवस्थापक पंकज सारंगधर केदारे व नितीन यशवंत शेंडे, रावेर आयसीआयसीआय बँकेचे शाखा प्रबंधक ऋषिकेश शिवाजी गव्हाणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तर सावदा पोलिसात बँक ऑफ बडोदाचे तत्कालीन शाखा प्रबंधक राम रहिश यादव (कार्यकाळ 25/4/2019 ते 12/11/2020) व शाखा प्रबंधक गणेश तळेले (कार्यकाळ दि.13/11/2020 ते आज पावेतो बँक) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मुक्ताईनगर पोलीस ठाण्यातही गुन्हा
मुक्ताईनगर तालुक्यातील 14 शेतकर्‍यांना पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही तसेच तीन शेतकर्‍यांना कमी फळ पीक विमा मिळाल्याच्या तक्रारीवरून तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिसांत आयसीआयसीआय बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या बँक व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल झाला. तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ करत आहेत.