शेतकर्‍यांना योजनांची माहिती बांधावर मिळावी हा शिवार संवादाचा उद्देश

0

शहादा । केंद्र व राज्य शासनाने कधी नव्हे या तीन वर्षात शेतकर्यांसाठी विविध योजना राबविल्या आहेत. शेतकर्‍यांना योजनांची व कामाची माहिती शेतबांधावर जाउन द्यावी हा शिवार संवाद सभेमागील उद्देश असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी केले. उत्तर महाराष्ट्र शिवार संवादाचा शुभारंभ दानवे यांच्या हस्ते नांदरखेडा ता. शहादा येथील वनश्री व नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांचा शेतावर झाला.

यांची होती उपस्थिती
यावेळी रोजगार हमी योजना व पर्यटनमंत्री जयकुमार रावल, भाजपा जिल्हाध्यक्ष तथा खा. हिना गावीत, आ. विजयकुमार गावीत ,ओबीसी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विजय चौधरी, संगठनमंत्री किशोर काळे, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, डॉ. टाटिया उपस्थित होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष खा. दानवे म्हणाले की, भाजपा येत्या चार दिवसात खानदेशात दहा हजार कार्यकर्त्यासह शेतकरी संवाद यात्रा करत आहे.

तापी बॅरेजस प्रकल्पावरील लिफ्टचा प्रश्न सोडविणार
जिल्ह्यातील तापी बॅरेजस प्रकल्पावरील लिफ्टचा प्रश्न तसेच लहान मोठे पाण्याचे प्रकल्पात पाणीसाठा आहे मात्र नियोजन नाही. शेतकर्यांच्या या व्यथा शासन स्तरावर मांडुन शेतात पाणी कसे पोहचणार? यावर भर दिला जाईल असे दानवे म्हणाले. जिल्ह्यात तापीनदीवरील सारंगखेडा प्रकाशा येथे बॅरेजसाठी एक हजार कोटी रुपये खर्च करुन शेतीस पाणी मिळ्णार होते? असा प्रश्न हरी पाटील यांनी विचारला असता प्रश्नास उत्तर देताना खा. दानवे म्हणाले कि, लवकरच लिफ्टच्या योजनासाठी राज्यशासनाकडून पाठपुरावा करून हा प्रश्न सोडविला जाईल. रोहयो, पर्यटन मंत्री रावल यांनी शेतामध्ये जाऊन शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेणे हा या संवादामागचा उद्देश असल्याचे सांगितले. शेतकर्यांचा सगळ्या समस्या येत्या दोन वर्षात समजून घेउन त्या सोडविण्यच्या 100 टक्के प्रयत्न करु, असे रावल यांनी सांगितले. यावेळी तहसीलदार मनोज खैरनार, सर्कल अधिकारी परदेशी, नायब तहसीलदार उल्हास देवरे उपस्थित होते.

स्वाभिमानीतर्फे निषेध
प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या या संवादयात्रेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून काळे झेंडे दाखविण्यात आले. जिल्हाध्यक्ष घनश्याम चौधरी यांच्यासह कार्यकर्त्यांनी नांदरखेडा रस्त्यावर उभे राहून प्रदेशाध्यक्ष दानवे यांना झेंडे काळा झेंडे दाखवीत निषेध केला. शिवारसंवाद कार्यक्रमास कृषीविभाग पं.स. लघुपाटबंधारे खात्यातील अधिकार्‍यांनी मात्र पाठ फिरविलेली दिसून आली.