शेतकर्‍यांना सरसकट नुकसान भरपाई द्या!

0

धुळे । बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याचा शब्द सरकारने दिला होता, मात्र दिलेला शब्द सरकारने पाळला नाही आणि शेतकर्‍यांची फसवणूक केली. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे. त्याचा एक दिवस आंदोलनातून उद्रेक होईल, म्हणून सरकारने शेतकर्‍यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार कुणाल पाटील यांनी तालुक्यातील शेतकर्‍यांसमवेत निवेदन देवून निवासी जिल्हाधिकार्‍यांकडे केली. यासंदर्भात त्यांनी निवेदन दिले आहे. 80 ते 90 टक्के शेतकरी बोंडअळी नुकसान भरपाईपासून वंचित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अनेक शेतकरी मदतीपासून वंचित
निवासी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन 2017- 18 च्या खरीप हंगामात धुळे तालुक्यात कापूस पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली होती. तालुक्यातील शेतकर्‍यांनी हजारो रुपये खर्च करुन कापूस पिकाचे जतन केले मात्र शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घासबोंडअळीमुळे हिरावला गेला. कृषी विभागाने पीक नष्ट करण्याचे सांगितले. त्यानुसार बहुसंख्य शेतकर्‍यांनी या पिकावरील रोगाचा प्रादुर्भाव रब्बी हंगामातील पिकांवर होवू नये, म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून सर्व पीक नष्ट केले. त्यानंतर शासनाने बोंडअळीग्रस्त कापूस पिकांचे पंचनामा करण्याचे आदेश दिले. हे पंचनामे केवळ उभ्या पिकांचेच झाले, परिणामी कृषी विभागाच्या सल्ल्याने ज्यांनी कापसाचे पीक नष्ट केले होते. ते शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहिले.ही बाब धुळे ग्रामिणचे आमदार कुणाल पाटील यांनी खरीप आढावा बैठकीतही पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली असता. त्यांना शासनाकडून सरसकट नुकसान भरपाईचा निर्णय करुन घेवू, असे आश्‍वासन दिले होते. परंतु अद्याप 80 ते 90 टक्के शेतकरी बोंडअळी नुकसान भरपाईपासून वंचित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.