शेतकर्‍यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास आपली प्रगती निश्‍चित होईल

0

जुन्नर । शेतकर्‍यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात शेतीत जास्त उत्पादन कसे मिळेल, याकडे लक्ष दिले तर आपली प्रगती निश्‍चित होईल, असे मत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी राजुरी येथे व्यक्त केले. राजुरी येथील विविध विकास कामांची उद्घाटने माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाली. यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील होते. आमदार शरद सोनवणे, जिल्हा परीषदेचे अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे युवा उपाध्यक्ष अतुल बेनके, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णु हिंगे, जुन्नर बाजार समीतीचे अध्यक्ष संजय काळे, रामभाऊ बोरचटे, गणपतराव फुलवडे, वसंतराव कदम, देवदत्त निकम, पाडुरंग पवार याप्रसंगी उपस्थित होते.

साखर कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर
नोकरी मिळत नसल्याने सध्याची तरुण पिढी शेतीकडे वळत असल्याचे पवार यांनी सांगितले. त्याचबरोबर सध्या सहकारी संस्था टीकवणे खूपच अडचणीचे झाले असून, सहकारी संस्था बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तसेच राज्यातील साखर कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. ऊसाची किंमत ठरवत असताना साखरेची किंमत ठरवणे गरजेच असते, यामुळे सध्या मिळत असलेल्या बाजारभावात एका टनामागे एक हजार रुपयांचा तोटा कारखानदारांना सहन करावा लागत असून, याचा फटका शेतकर्‍यांना बसत असल्याचेही त्यांनी सांगितले.

…म्हणून सहकारी संस्था टिकल्या
राजुरी येथील सर्व संस्था या राजकारणावर न लक्ष देता समाजकारणावर लक्ष देत असल्याने येथील सहकारी संस्था टिकल्या आहेत. तसेच येथील पतसंस्थेच्या ठेवी शंभर कोटींच्यावर गेल्या आहेत. याबरोबरच दूध संस्थेचे दररोजचे दूध संकलन 40 हजार लिटर असल्याचे आमदार सोनवणे यांनी सांगितले. यावेळी अतुल बेनके यांचेही भाषण झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज गावडे यांनी तर आभार पाडुरंग पवार यांनी मानले.

कारखानदारी अडचणीत
सध्या उसाला, दूधाला आणि शेत मालाला योग्य बाजार भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. राज्यातील कारखानदारी अडचणीत आलू असून कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
– दिलीप वळसे पाटील,
विधानसभेचे माजी अध्यक्ष