शेतकर्‍यांनी आमदारांकडे कर्जमाफीसाठी आग्रह

0

रावेर । पंडित दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी संघटन वर्षानिमित्त आयोजित शिवार संवाद यात्रेनिमित्त गुरुवारी आमदार हरिभाऊ जावळे अहिरवाडीत आले होते. या वेळी उपस्थित शेतकर्‍यांनी त्यांच्याकडे सरकारने कर्जमाफीचा निर्णय घ्यावा. कर्जमाफी होत नसल्याने शेतकरी मरणासन्न अवस्थेत असल्याबद्दल त्रागा व्यक्त केला. इतर कामांबाबतही आमदारांकडे विचारणा करण्यात आली. शिवार संवाद कार्यक्रमानिमित्त आमदार जावळेंनी गुरुवारी रसलपूर, अहिरवाडी या ठिकाणी छोटेखानी बैठका घेतल्या.

आश्वासनाची करून दिली आठवण
माजी सभापती सुरेश धनके, पंचायत समिती सभापती माधुरी नेमाडे, उपसभापती अनिता चौधरी, पद्माकर महाजन, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.मिलिंद वायकोळे, तालुकाध्यक्ष सुनील पाटील, जिल्हा परिषद सदस्या रंजना पाटील, पी.के.महाजन आदी उपस्थित होते. अहिरवाडीत महादेव मंदिरात सभा सुरु असताना शेतर्‍यांनी आमदारांना दिलेल्या कर्जोद-अहिरवाडी रस्ता तयार करून देण्याच्या आश्वासनाची आठवण करून दिली. रस्त्याची दुरवस्था झाल्याने पायी चालणे मुश्किल झाले आहे. तसेच शेतीशिवार रस्ते, गंगापुरी प्रकल्पाचे पाणी पाझर तलाव, मंगरूळ प्रकल्पाचे पाणी भिलाई तलावात सोडणे, पीक विमा योजनेचे पैसे मिळणे, शेतकरी कर्जमाफी कधी मिळेल अशा प्रश्नांची सरबत्ती केली. आमदार जावळेंनी शांतपणे शेतकर्‍यांची बाजू समजून घेत उपस्थित समस्या सोडवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. तसेच कर्जोद-अहिरवाडी रस्ता जिल्हा नियोजन समितीकडे मंजुरीसाठी पाठवल्याचे सांगितले. मात्र, शेतकर्‍यांचे समाधान झाले नाही. यानंतर इतरही गावांमध्ये अनेक शेतकर्‍यांनी त्यांच्याकडे शेतकरी कर्जमाफीचा आग्रह धरला.