शेतकर्‍यांनी घातले सरकारचे श्राद्ध

0

मुंडन करून केला सरकारचा दशक्रिया विधी; पाटस बंदला उत्फुर्त प्रतिसाद

यवत । दौंड तालुक्यातील कानगाव येथील शेतकर्‍यांनी आपल्या विविध 11 मागण्यांसाठी 2 नोव्हेंबरपासून आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे. त्यांनी बेमुदत संप पुकारला असून या संपाचा गुरुवारी आठवा दिवस होता. या संपाला सात दिवस पूर्ण झाल्याने संपकरी शेतकर्‍यांनी मुंडन करून सरकारचा दशक्रिया विधी घातला. शेतकर्‍यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पाटस बंद ठेवण्यात आले होते. या बंदला उत्फुर्त प्रतिसाद मिळाला.

पाच दिवसांपासून चूल बंद
या शेतकरी आंदोलनाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असुन तालुक्यातील इतर गावे बंद ठेवून या शेतकरी आंदोलनास पाठिंबा दिला जात आहे. आज पाटस येथील ग्रामस्थांनी संपूर्ण गाव बंद ठेवीत या शेतकरी संपाच्या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. कानगाव येथील शेतकर्‍यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी शेतकरी आक्रोश संपाचे हत्यार उचलले आहे. येथील शेतकरी पाच दिवसांपासून चूल बंद आंदोलन करत आहेत. तर सर्व शेतकरी आणि पदाधिकारी साखळी उपोषण आणि विविध मार्गाने संप करत आहेत. जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करीत नाही. तोपर्यंत, हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे.

सरकारचा नोंदवला निषेध
कानगाव येथे संपाच्या सातव्या दिवशी शेतकर्‍यांनी सामुहिक मुंडण केले आणि सरकारचा दशक्रियाविधी घालून निषेध नोंदविण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने महिला शेतकरी उपस्थित होत्या. सरपंच संपत फडके, उपसरपंच बापू कोर्‍हाळे, भानुदास शिंदे, सयाजी मोरे, माऊली शेळके, संतोष गवळी, संतोष शेलार व इतर मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.