रेशीम कोष खरेदी केंद्राचे उद्घाटन
बारामती : रेशीम शेती ही कमी पाण्यावर होऊ शकते. त्यामुळे शेतकर्यांनी रेशीम उद्योगाकडे वळण्याची गरज आहे. या रेशीम उद्योगासाठी पुणे जिल्हा बँकच्या माध्यमातून पीक कर्ज भविष्यात उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. नागपूरमधील रेशीम संचालनालयाने बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रेशीम कोष खुली बाजारपेठ सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार सुरू करण्यात आलेल्या रेशीम कोष खरेदी केंद्राचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार दत्तात्रय भरणे, विश्वासराव देवकाते, राजेंद्र पवार, भाग्यश्री बानायत याप्रसंगी उपस्थित होते.
रेशीम बाजारपेठ विकसीत करणार
रेशीम उद्योग हा रोजगार निर्मिती करणारा उद्योग आहे. रेशीम लागवड जोपासना, किटक संगोपन, तुती रोपांचा खर्च, शेड हे एमआरईजीएस योजनेतून शेतकर्यांना मिळत आहे. कर्नाटक राज्यातील रामनगर येथील रेशीम कोष मार्केटच्या धर्तीवर येथील रेशीम बाजारपेठ भविष्यात विकसित करण्यात येईल, असे अजित पवार यांनी पुढे बोलताना सांगितले. अनिल हिवरकर यांनी सूत्रसंचालन केले.