शेतकर्‍यांनी विषमुक्त शेतीकडे वळावे -आबासाहेब मोरे

0

अंतुर्लीत कृषी विषयक मार्गदर्शनपर चर्चासत्र : सेंद्रिय शेतीवर भर देण्याबाबत आवाहन

मुक्ताईनगर- शेतकर्‍यांनी रासायनिक खते व औषधांचा वापर टाळून विषमुक्त शेती करण्यावर भर द्यावा, सेंद्रीय शेती कसण्याकडे कल वाढवावा, असे आवाहन प.पू.अण्णासाहेब मोरे यांचे सुपुत्र आबासाहेब मोरे यांनी केले. तालुक्यातील अंतुर्ली येथे श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित) व अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर द्वारा ग्राम व नागरी अभियानांतर्गत मानवी समस्या निवारण, कृषी विषयक मार्गदर्शन व चर्चासत्र झाले. प्रसंगी आबासाहेब मोरे यांनी सेंद्रीय शेतीतून मिळणार्‍या उत्पन्नाचे दाखले देत अध्यात्मिक सेवा वाढवित भक्ती डोळसपणे करून भारताची संस्कृती टिकविण्याचे आवाहन केले. सण-उत्सवांचे बीभत्सीकरण थांबवा, असे त्यांनी सांगत सेंद्रीय शेतीतून उत्पादीत गहू आरोग्यासाठी किती कसदार आहेत याचे दाखले त्यांनी शेतकर्‍यांना दिले. कितीही ड्रोनने फवारण्या केल्या तरी शेतीचे उत्पन्न वाढणार नाही . यासाठी प्राचीन ऋषीमुनींनी ज्या तंत्रज्ञान व तत्वज्ञानाने शेती कसे संशोधन केले याचा अभ्यास करून शेतीचे उत्पन्न वाढविण्यावर भर द्यावा, असेही ते म्हणाले.