शेतकर्‍यांनी संघटित आवाज उठवावा

0

धुळे। राज्यातील शेतकरी सततचा दुष्काळ,नापिकी व कर्जाच्या संकटात सापडला आहे, कर्जमाफीसाठी राज्यातला शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. संपुर्ण राज्यभर आंदोलन होत असतांना भाजप सेनेचे सरकार मात्र कर्जमाफीवर उदासीन आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी संघटितपणे आवाज उठवला पाहिजे असे आवाहन आ.कुणाल पाटील यांनी केले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून आ.कुणाल पाटील यांच्या प्रयत्नाने बोरकुंड-नंदाळे या रस्त्याला मंजुरी मिळाली. त्या रस्त्याचे आ.कुणाल पाटील यांच्या हस्ते भुमीपूजन करण्यात आले.

शेतकर्‍यांतच भांडणे लावण्याच्या षडयंत्राचा आरोप
यावेळी बोलतांना आ. पाटील म्हणाले की,निवडणुकीच्या वेळेस मी बोरकुंड आणि नंदाळे ग्रामस्थांना शब्द दिला होता त्यानुसार आज या रस्त्याच्या कामास प्रारंभ होत असून तालुक्यातील इतर रस्ते करीत असतांना या रस्त्याला प्राधान्य देण्यात आले. शेतकरी आंदोलनाबाबत बोलतांना आ.पाटील सांगितले की सरकार शेतकर्‍यांमध्ये फूट पाडून शेतकर्‍यांतच भांडणे लावण्याचे षडयंत्र करीत आहे. म्हणून शेतकर्‍यांनी संघटीतपणे उभे राहून सरकारला झुकविले पाहिजे. कुुंडाणे निमखेडी ते जापी रस्त्याच्या मंजुरीकामी धुळे शहराचे आ.अनिल गोटे यांचे विशेष सहकार्य मिळाले. त्यांच्या सहकार्याने कुुंडाणे (निमखेडी) ते जापी हा रस्ता मंजुर करण्यात आला. भविष्यात वरखेडी-कुंडाणे दरम्यान रस्त्यावरील नाल्यावर पुल कम बंधारा उभारण्यासाठी प्रयत्न केले जातील. अत्यंत कमी कालावधीत आपण तालुक्यात सुमारे 41 कोटी रूपयांच्या रस्त्यांची कामे केली आहेत. बोरकुंड ते नंदाळे हा एकूण 4.50 कि.मी. अंतराचा असून यासाठी एकूण 2 कोटी 15लक्ष रुपये निधी मंजुर करण्यात आला आहे.