पुणे । यंदा जिल्ह्यासह राज्यात समाधानकारक पाऊस पडणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. त्यामुळे खरीप हंगाम यशस्वी करावा, असे आवाहन कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे. दर्जेदार आणि योग्य किंमतीत बियाणे, रासायनिक खते आणि इतर सामुग्री पुरविण्याच्या दृष्टीने कृषी विभागाकडून पुर्ण नियोजन करण्यात आले आहे. राज्यामधील कापूस, सोयाबीन, भात, तूर व मका या प्रमुख खरीप पिकांच्या उत्पादनावर परिणाम न करता, उत्पादन खर्चात कपात करण्याच्या दृष्टीने खालीलप्रमाणे सुचविलेल्या तंत्रज्ञानाचा शेतकर्यांनी अवलंब करावा, जेणेकरून त्यांच्या उत्पन्नात निश्चितच वाढ होईल, असेही कृषी आयुक्तांनी सांगितले.
सोयाबीन पिकाची पेरणी करताना 75 ते 100 मि. मी. पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. बियाण्याची पेरणी 3 ते 4 सेंमी खोलीपर्यंत करावी. शेतकर्यांनी बियाणे, खते, किटकनाशके-औषधे ही अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करावे. किटकनाशकांची फवारणी करताना योग्य ती काळजी घ्यावी. संकरीत वाण वगळता सुधारीत वाणांचे प्रमाणित बियाणे दरवर्षी नव्याने खरेदी न करता 3 वर्षांपर्यंत वापरावे. बियाण्यांची बचत होईल, अशा लागवड पद्धत्तीचा अवलंब करावा. जमीन आरोग्य पत्रिकेतील शिफारशीनुसारच रासायनिक खतांचा वापर करावा, असे सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.
अळ्यांच्या नियंत्रणासाठी कामगंध वापरा
सोयाबीन, तुर, कापुस, भाजीपाला या पिकांवरील अळ्यांच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळ्याचा वापर करावा. आंतरपिक पद्धतीचा अवलंब केल्यास टंचाई किंवा आपत्कालिन परिस्थितीत मुख्य पिकाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला तरी, आंतरपिकाच्या उत्पादनामुळे जोखीम कमी होण्यास मदत होते. कापुस आणि सोयाबीन, कापुस आणि मुग, कापुस आणि उडीद, सोयाबीन आणि तुर, ज्वारी आणि तुर, भाताच्या बांधावर तुर इत्यादी लागवड पद्धती यशस्वी ठरल्याने त्यांचा मोठ्या प्रमाणावर अवलंब करावा, असे सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.
सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करा
जमिनीतून पसरणार्या रोगांवर नियंत्रणासाठी जैविक किंवा रासायनिक किडनाशकांची बीजप्रक्रिया करावी. जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी मुलस्थानी जलसंधारण पद्धत्तीचा अवलंब करावा तसेच जिराईत पिकांसाठी पावसातील खंडाच्या काळात संरक्षित सिंचन द्यावे, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी तुषार व ठिबक सिंचनासारख्या सुक्ष्म सिंचन पद्धतीचा पिकांसाठी शिफारशीनुसार अवलंब करावा. जिराईत पिकांच्या पेरणीसाठी फारच मर्यादीत कालावधी मिळत असल्याने एकाच वेळी गादीवाफे तयार करणे, बियाणे पेरणे व बियाण्याच्या ठिकाणी खत देणे ही कामे करण्यासाठी रूंद वाफा सरी यंत्राचा (बीबीएफ) वापर करावा, अशा सूचना सचिंद्र प्रताप सिंह यांनी केल्या आहेत.
पेरणीची घाई करू नका
मान्सून केरळात दाखल झाला असून येत्या 8 जूनपर्यंत महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर शेतकरी सध्या वरुणाराजाच्या प्रतिक्षेत आहे. पाऊस पडल्यानंतर शेतकर्यांकडून तत्काळ पेरणीची कामे हाती घेतली जातील. मात्र पुरेसा पाऊस न झाल्याने पेरलेली बियाणे उगवत नाही. परिणामी शेतकर्यांवर दुबार पेरणीची वेळ येते. त्यामुळे शेतकर्यांनी पेरणीची घाई करू नये. तसेच 65 मिमीच्या पुढे पाऊस झाल्यावर व जमिनीमध्ये ओलावा निर्माण झाल्यानंतरच पेरणी करावी.
पीक योजनेचा लाभ घ्या
शेतकर्यांनी पिकांच्या नुकसानीच्या कठीण परिस्थितीतही आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेत जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा. बिगर कर्जदार शेतकर्यांसाठी योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत 24 जुलै 2018 असून शेतकर्यांनी शेवटच्या आठवड्यात बँकामध्ये गर्दी करण्यापेक्षा वेळीच योजनेत सहभाग घ्यावा. दरम्यान, काही अडचणी किंवा समस्या असल्यास जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा आणि खरीप हंगाम यशस्वी करावा.
– सचिंद्र प्रताप सिंह, कृषी आयुक्त