शेतकर्‍यांनो बँकेत खाते उघडून कॅशलेस व्यवहार करा

0

रावेर : भारत सरकार कॅशलेस पध्दतीने वाटचाल करीत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत हमाल, मापाडी, शेतकरी व व्यापार्‍यांनी आपली खाती बँकेत उघडून कॅशलेस पध्दतीने व्यवहार करण्याचे आवाहन सभापती डॉ. राजेंद्र पाटील यांनी केले. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात हमाल, मापाडी व शेतकर्‍यांसाठी आयसीआयसीआय बँकेतर्फे शिबीर घेण्यात आले. यावेळी सभापती पाटील बोलत होते.व्यासपीठावर उपसभापती प्रमोद धनके, संचालक योगेश पाटील, गोंडू महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोपान पाटील, व्यापारी कन्हैय्या अग्रवाल, अतुल अग्रवाल, सचिव गोपाळ महाजन, बँकेचे व्यवस्थापक किशोर पाटील आदी उपस्थित होते.

फसवणूक टाळण्यासाठी डीडीने व्यवहार करा
सध्या कपाशीचा हंगाम सुरु असल्याने अनेक व्यापारी गावोगावी जावून शेतकर्‍यांकडून कपाशी खरेदी करीत आहे व याची रक्कम चेकद्वारे दिली जात आहे परंतु चेक बाऊन्स होण्याचे प्रमाण वाढत असल्याने शेतकर्‍यांची फसवणूक होत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून व्यापार्‍यांकडून शक्यतो डीडी घेवूनच व्यवहार करावे, असे आवाहन बँक व्यवस्थापक किशोर पाटील यांनी केले.

150 खाती उघडली
या शिबिरास हमाल, मापाडींनी भरभरुन प्रतिसाद दिला. तब्बल एका तासात 150 खाती स्वतःहून उघडून सरकारच्या कॅशलेस धोरणासोबत काम करण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले आहे.