शेतकर्‍यांपुढे सत्ता महत्वाची नाही

0

बुलढाणा। शेतकर्‍यापेक्षा मला सत्ता महत्वाची वाटत नाही. शेतकरी कर्जमुक्त नाही झाला तर राज्यात भूकंप येईल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. ’सरकारने जी कर्जमुक्तीची घोषणा केली आहे त्याची अंमलबाजावणी करण्याची ताकद आणि बुद्धी सरकारला देवो अशी प्रार्थना करतो’, असंही उद्धव ठाकरे बोलले आहेत.

कर्जमाफीला फाटा देण्यासाठी मध्यावधीची भाषा
राज्यातील शेतकर्‍यांच्या कर्जमाफीला फाटा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून मध्यावधी निवडणुकीचे मनसुबे आखण्यात येत असतील तर ते आम्ही उधळून लावू, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. ते गुरूवारी बुलडाण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. कर्जमाफीची अंमलबजावणी होईपर्यंत शिवसेना शेतकर्‍यांच्या पाठिशी ठामपणे उभी राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. सरकारला कदाचित शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या विषयाला बगल द्यायची आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून मध्यावधी निवडणुका घेण्याची भाषा सुरू झाली आहे.

तर तो पैसा शेतकर्‍यांना द्या
भाजपकडे मध्यावधी निवडणुकांसाठी एवढाच पैसा असेल तर तो त्यांनी शेतकर्‍यांना द्यावा. त्या मोबदल्यात शिवसेना तुम्हाला पाठिंबा देईल. मात्र, कर्जमाफी टाळण्यासाठी मध्यावधी निवडणुका घ्यायचे मुख्यमंत्र्यांचे मनसुबे असतील, तर ते यशस्वी होऊ देणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.