पिंपरी । राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीपासून विधीमंडळात शेतकर्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर रणकंदन सुरू आहे. अशा वातावरणात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शेतकर्यांच्या मागण्यांमुळे शिक्षणासाठी कमी बजेट मिळत आहे, असे वादग्रस्त वक्तव्य करून सरकारला आणखी अडचणीत आणले आहे.
पिंपरीमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सृजन ट्रस्टच्या वतीने राज्यस्तरीय प्रदर्शन आणि स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. डिपेक्स या कार्यक्रमाच्या समारोप कार्यक्रमात बोलताना तावडे म्हणाले, शिक्षणासाठी 2 लाख 10 हजार कोटी रुपयांचे बजेट आहे. त्यापैकी 57 हजार कोटी केजी टू पीजीसाठी माझ्याकडे येतात. आता यापेक्षा जास्त निधी मला मिळू शकत नाही. कारण शेतकर्यांना टोल फुकट हवा असतो, धरणांची संख्याही वाढायला हवी, जलसंधारणाचे कामेही वाढवणे गरजेचे असते. या विकासकामांसाठी सरकारला अधिक पैसा द्यावा लागतो आणि मग शिक्षणासाठीची तरतूद कमी होते, असे ते म्हणाले.