शेतकर्‍यांवरील गुन्हे मागे घेणार

0

वडगाव मावळ । राज्यातच नव्हे तर देशात चर्चा आणि चिंतनाची घटना बनलेल्या मावळ गोळीबार प्रकरणात शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. आंदोलनातील शेतकर्‍यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे सरकार मागे घेणार आहे. आठ ऑगस्ट रोजी हे गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत, असे आश्वासन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले असल्याची माहिती, मावळचे आमदार बाळा भेगडे यांनी दिली. आमदार बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांची आज (गुरुवारी) भेट घेऊन शेतकर्‍यांवरील गुन्हे मागे घेण्याची विनंती केली. मुनगंटीवर यांनी त्वरित गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले आहे.

सरकार सकारात्मक
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्यासोबत आमदार बाळा भेगडे आणि शेतकर्‍यांची मुंबईत बैठक झाली. यावेळी मुनगंटीवर म्हणाले, आमदार भेगडे यांच्या नेतृत्वाखाली झालेले आंदोलन हे अत्यंत योग्य होते. आंदोलक शेतक-यांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. नुकसानी बाबत चुकीची माहिती देऊन आंदोलक शेतकर्‍यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. सरकार शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. चुकीच्या मार्गाने नोंदविलेले गुन्हे निश्चितपणे मागे घेण्यात येतील. आठ ऑगस्ट रोजी बैठक घेऊन गुन्हे मागे घेण्यात येतील, असे आश्वासन मुनगंटीवार यांनी दिले आहे, अशी माहिती बाळा भेगडे यांनी दिली.

190 शेतकर्‍यांवर आहेत गुन्हे दाखल
9 ऑगस्ट 2011 रोजी पवना धरणातून भुमिगत जलवाहिनीच्या विरोधात शेतकर्यांनी पुणे-मुंबई महामार्गावर आंदोलन केले होते. आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्यामुळे पोलिसांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात तीन शेतकर्यांचा बळी गेला होता. त्यानंतर तत्कालीन सरकारने मावळातील सुमारे 190 शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल केले होते.

 

यांची होती उपस्थिती
या शिष्टमंडळात भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष शंकर शेलार, मावळ पंचायत समितीचे माजी सभापती एकनाथ टिळे, ज्ञानेश्वर दळवी, भाजपचे मावळ प्रभारी भास्करराव म्हाळसकर, आरपीआयचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, भाजप अध्यक्ष प्रशांत ढोरे, शिवसेना मावळ विभाग प्रमुख राजू खांडभोर, शिवसेना जेष्ठ नेते भारत ठाकूर, भाजुयोमेचे अध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, कार्याध्यक्ष अजित आगळे, राजेश मु-हे, संदीप भुतडा, मधुकर धामणकर, रामा गोपाळे, संभाजी म्हाळसकर तसेच आंदोलक व शेतकरी उपस्थित होते.