जळगाव । ज्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेत ’कॅश’ उपलब्ध नसल्याने शेतकर्यांना पीक कर्ज वेळेवर देता येत नाही. जिल्हा बँक शाखेत ’कॅश’ उपलब्ध करून देण्यात यावी या मागणीचे निवदेन जिल्हाबँक अध्यक्षा रोहणी खडसे, उपाध्यक्ष तथा शिवसेना आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत संचालकांनी शुक्रवारी 12 मे रोजी जिल्हाधिकार्यांना दिले. जिल्हा बँकेच्या ग्रामीण शाखांमध्ये एटीएमची सेवा उपलब्ध नाही. तसेच शेतकर्यांनी किसान कार्ड घेतलेले आहे. कर्ज घेण्यासाठी केंद्र शासनाने रुपे किसान कार्ड सुरु केले आहे. परंतु जळगाव जिल्हा बँक ही ग्रामीण भागातील असून जिल्ह्यातील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात अशिक्षीत आहे. तसेच एटीएममध्ये रोकडे उपलब्ध नसल्याने शेतकर्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होईल या उद्देशान जळगाव जिल्हा बँकेने शाखेतच स्लिप भरुन कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा बँकेला दररोज 5 कोटी पेक्षा जास्त रकमेची आवश्यकता असते प्रत्यक्षात 5 ते 10 लाखाची रोकड उपलब्ध होते त्यामुळे कर्ज पुरवठा वेळेवर होत नाही. त्यामुळे शेतकर्याचे हाल होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
जिल्हाधिकार्यांना निवेदन
एटीएमद्वारे शेतकर्यांना पीक कर्जाची रक्कम मिळत नसल्याने शेतकर्यांचे हाल होत आहे. तसेच बँकेत विड्रॉल स्लिपने रक्कम काढण्याची सुविधा सुरू केली आहे. परंतु पुरेशी ’कॅश’ उपलब्ध नसल्यामुळे शेतकर्यांना विड्रॉल स्लिपप्रमाणे रक्कम देता येत नाही. यामुळे शेतकर्यांचा संताप होत आहे. पावसाळा तोंडावर आला आहे. शेतकर्यांंना बियाणे खरेदीसाठी रक्कमेची आज गरज आहे असे असतांना जिल्हा बँकेत पुरेसा ’कॅश’ उपलब्ध नसल्याने शेतकर्यांचे बेहाल आहे. एकीकडे शेतकर्यांची बँक म्हणून जिल्हा बँकेची ख्याती आहे. मात्र या बँकेचा कणा असलेल्या शेतकर्यांना ’कॅश’ उपलब्ध नसल्याने पिक कर्ज मिळत नाही आहे. यासाठी जिल्हा बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीत सर्व संचालकांनी जिल्हाधिकार्यांना ’कॅश’ उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन सादर केले आहे.
महिन्याभरात होणार शेतीच्या कामांना सुरूवात : मान्सून हवामानाचे आगमन होण्यासाठी आता 20 दिवस शिल्लक उरले असून शेतीच्या पेरणीसाठी लागणारे बि-बियाणे घेण्यासाठी शेतकरी कर्ज काढण्यासाठी जिल्हा बँके भोवती चकरा मारत असल्याची खंत यावेळी उपस्थितांनी केली.
यांची होती उपस्थिती
निवेदन देतांना संचालक गुलाबराव देवकर, नानासाहेब देशमुख, अमोल पाटील, वाडीलाल राठोड, तिलोत्तमा पाटील, गणेश नेहते, खासदार ए.टी. पाटील, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे यांच्यासह कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांची उपस्थिती होती. शेतकर्यांना होणारी पैशांची चणचण भासत असून जिल्हा प्रशासनान शासनाला जिल्हा बँकेला रोक रक्कम उपलब्ध करून् देण्याची विनंती केली आहे.