नारायणगाव । ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र आणि शुअर शॉट यांच्या संयुक्त विद्यमाने पारंपारिक शेतीत अडलेल्या शेतकर्यांना गतिमान आणि गतिमान शेतकर्यांना ग्लोबल करण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषद, नाबार्ड, आत्मा, आरसीएफ, डॉ. बाविस्कर टेक्नॉलॉजी, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया व कृषी विभागाच्या सहकार्याने येत्या 4, 5, 6, 7 जानेवारी दरम्यान ग्लोबल फार्मर्स ऍग्री एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे. हे कृषी प्रदर्शन शेतकर्यांना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान देऊन ग्लोबल बनविणारे महाराष्ट्रातील एकमेव कृषी प्रदर्शन ठरेल, असा विश्वास यावेळी केंद्राचे चेअरमन कृषिरत्न अनिल मेहेर यांनी व्यक्त केला.
प्रगतीच्या अगणीत सुवर्णसंधी
4 ते 7 जानेवारी दरम्यान, दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 6, नारायणगाव येथे, कृषी विज्ञान केंद्राच्या भव्य प्रक्षेत्रावर शेतकरी, महिला शेतकरी, विद्यार्थी, कृषी उद्योजक, कृषी सेवा पुरवठादार यांच्यासमोर प्रगतीच्या अगणीत सुवर्णसंधी खुल्या होणार आहेत आणि दर वर्षीप्रमाणेच यंदाही एक लाखाहून अधिक शेतकरी प्रदर्शनास उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. कृषी ज्ञान तंत्रज्ञानाच्या या जागतिक कुंभमेळ्याचा आपणही लाभ घ्यावा असे आवाहन मेहेर यांनी केले.
दिशा देणारी खास चर्चासत्रे
शेळीपालन, दुग्धव्यवसाय, विविध शेतीपुरक जोडधंदे, कांदा, टोमॅटो, द्राक्ष उत्पादन, शासकीय योजना, मुल्यवर्धन, प्रक्रिया, विक्री, हायटेक शेती तंत्रज्ञान आदी अनेक विषयांवरील पिक परिसंवाद, शेतकर्यांच्या आर्थिक विकासाला नवी दिशा देणारी खास चर्चासत्रे देखील आयोजित केले आहे. यावेळी शेतीत उल्लेखनीय कार्य केलेल्या शेतकरी, महिला शेतकरी, कृषी उद्योजक, कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण गोष्टी जगासमोर आणणारा कृषी पत्रकार, मार्गदर्शन करणारा कृषी विस्तार कार्यकर्ता यांना ग्रामोन्नती कृषी सन्मानाने गौरविण्यात येणार आहे.
250 कंपन्यांचा सहभाग
ग्लोबल फार्मर्सचे कृषी प्रदर्शनाचे खास आकर्षण म्हणजे प्रदर्शनातील शिवार फेरी. शासरोक्त पद्धतीने उभारलेली 47 पिकांच्या 96 वाणांची भव्य पिक प्रात्यक्षिके. प्रदर्शनाच्या महामंडपात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील कृषी ज्ञान, तंत्रज्ञान, संशोधनात अग्रेसर असलेल्या 250 हून अधिक राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय कंपन्या, संस्थांचा सहभाग. नवीन खते, औषधे, बियाणे, यंत्र, अवजारे, उपकरणे, शेतमाल विक्री, करार शेती, शेतकर्यांच्या दिमतीला उभ्या असलेल्या स्वयंसेवी संस्था आणि यासह शेतकर्यांना ग्लोबल होण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रकारचे कृषी तंत्रज्ञान सादरीकरण या प्रदर्शनातून शेतकर्यांना पहावयास मिळणार आहे.
महामंडपाचे भूमिपूजन
शेतीसाठी आणि शेतीतील प्रत्येकासाठी प्रगतीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देणार्या अशा अनोख्या कृषी प्रदर्शनाच्या महामंडपाचे भूमिपूजन जय आनंद कृषी उद्योग समूहाचे संचालक महेश बोरांना व उद्योजक लतीफ पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामोन्नती मंडळाचे विश्वस्थ डॉ. श्रीकांत विध्वंस, कार्याध्यक्ष अनिलतात्या मेहेर, अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्यवाह रवींद्र पारगावकर, उपकार्याध्यक्ष डॉ. आनंद कुलकर्णी, सहकार्यवाह अरविंद मेहेर, संचालक शशिकांत वाजगे, रत्नदीप भरवीरकर, बाळासाहेब भुजबळ, प्रशांत शेटे, रुपेश कोळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.