शेतकर्‍यांसाठी ‘दिशा…वाट कृषि कल्याणाची’ शॉर्ट फिल्मचे कौतुक

0

पाळधी । औरंगाबाद येथे खंडपिठात काम करणारे विधितज्ञ अ‍ॅड. अजय तल्हार यांनी महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांचा मागोवा घेणारी दिशा वाट कृषिकल्याणाची ही शॉर्ट फिल्म तयार केली आहे. या फिल्ममध्ये शेतीमालासाठी खर्चावर आधारित हमी भाव देण्याविषयीचा निर्णय न्यायालय देत आहे असे दाखविले आहे. ही भूमिका योग्य असून शिवसेना हा राजकिय पक्ष सुध्दा याच मताशी सहमत आहे, असे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. जळगाव येथे आज अ‍ॅड. तल्हार यांचा सत्कार ना. गुलाबराव यांच्याहस्ते करण्यात आला.

अ‍ॅड. अजय तल्हार यांच्या प्रयत्नांचे सहकार राज्य मंत्र्यांकडून सत्कार
अवघ्या 23 मिनिटांच्या शॉर्ट फिल्ममध्ये अ‍ॅड. तल्हार यांनी शेतकरी आत्महत्येचे कारण, शेतकर्‍यांची कौटुंबिक कोंडी व त्यावरील उपाय सांगितला आहे. ही शॉर्ट फिल्म प्रत्येक शेतकर्‍यांपर्यंत पोहली पाहिजे, असे ही ना. पाटील म्हणाले.अ‍ॅड. तल्हार म्हणाले, मी जळगावचा रहिवासी आहे. विधीसेवा देताना शेतकर्‍यांचे अनेक प्रश्‍न मी पाहतो. शेतकरी हा सतत कर्जबाजारी असतो. कारण तो शेतीत जो पैसा खर्च करतो त्यातुलनेत शेतीमालास भाव मिळून नफ्याचा परतावा मिळत नाही. त्यामुळे शेतकरी वारंवार कर्जबाजारी राहतो हे माजे निरीक्षण आहे.

ही समस्या मांडणे, शेतकर्‍यांची कोंडी दाखविणे आणि शेतीमालास उत्पादनाव आधारित हमीभाव देणे आवश्यक आहे. जर सरकार अशाप्रकारे हमी भाव देत नसेल तर आता न्यायालयात जावून बाजू मांडायला हवी असेही मत अ‍ॅड. तल्हार यांनी मांडले. दिशा वाट कृषिकल्याणाची या शॉर्ट फिल्ममध्ये कांदा उत्पादक शेतकर्‍यांची व्यथा दाखविली आहे. केंद्याचा भाव अवघा 5 पैसे जाहीर झाल्यामुळे हबल होवून तो ट्रकसमोर उडी मारुन आत्महत्या करतो. त्यानंतर एक जनहित याचिकेद्वारे हा प्रश्‍न न्यायालयात जातो. तेथे न्यायाधिश सरकारला आदेश देवून खर्चावर आधारित हमी भाव द्या, असा आदेश देतात. चित्रपटाच्या या आशयाचे ना. गुलाबराव पाटील यांनी कौतुक केले आहे.