शेतकर्‍यांसाठी नव्हे ही तर बांधणी मोहीम

0

राजकीय वर्तुळात सतत मध्यावधी निवडणुकांच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकत्र घेतल्या जातील, असेही चित्र निर्माण केले जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मध्यावधी निवडणुकांची अशीच पुडी भाजपकडून पद्धतशीरपणे सोडण्यात आली होती. शिवसेनेचे मंत्री खिशात राजीनामे घेऊन फिरत असल्याच्या बढाया मारत होते. एवढंच काय पण सरकार पडून नवीन निवडणुका होतील, असे गृहीत धरून शिवसेनेसह सर्वच विरोधी पक्ष कंबर कसून निवडणुकीच्या तयारीला लागले होते. भाजपपणे पद्धतशीरपणे हे पसरवल्याने ते इतरांच्या हालचालींवर हास्य करत होते.

विरोधीपक्ष मात्र यासाठी नक्कीच तयारीला लागल्याचे चित्र दिसत आहे.ज्या गोष्टी त्यांनी निवडणुकांच्या आधी करायला हव्या होत्या त्या त्यांनी आता करायला सुरुवात केली आहे. कोणी आसूडयात्रा काढत आहे, तर कोणी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर महाराष्ट्रभर संघर्ष अभियान राबवत आहेत. शेतकर्‍यांनी पिकवलेली तूर हमीभावाने सरकारने खरेदी करावी म्हणून दिवसेंदिवस आंदोलन तापवले जात आहे. अवकाळी पाऊस, गारपिटीच्या प्रश्‍नाला हात घातला जातोय. मंत्रालयात आणि मंत्रालयासमोर, कांदा फेक, तूर ओत, अशी आंदोलने छेडली जात आहे. जो मिळेल तो विषय उचलून धरायचा सपाटा काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून लावला जातोय. जणूकाही आपणच शेतकर्‍यांचे तारणहार आहोत, अशा आविर्भावात काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेनेवर हल्ला करीत आहेत. शिवसेनाही त्यांना उत्तर देत आहे. शिवसेना सत्तेतील पक्ष असूनही तो विरोधी पक्षांप्रमाणे कामाला लागला आहे. मध्यावधीच्या चाहूलीने शिवसेनेने संघटनात्मक बांधणीवर जोर दिला असून, यासाठीच शिवसंपर्क अभियान राबवण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना सत्तेवर आली खरी. परंतु, भाजपने त्यांच्या नाकीनऊ आणले होते. भाजपने सेनेच्या हाती सत्ता देताना ज्यासाठी मुंबई महापालिका त्यांच्या हातात दिली त्याचा आत्माच काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे. जीएसटीचे भूत महापालिकेच्या मानगुटीवर बसवले जाणार आहे. त्यामुळे महापालिकेला मिळणारा सारा पैसा केंद्र आणि राज्य सरकारच्या तिजोरीत जाणार आहे. मुंबई महापालिकेला जकातीच्या माध्यमातून मिळणार्‍या 7 हजार कोटी रुपयांच्या उत्पन्नाला मुकावे लागणार आहे. त्यामुळे जीएसटी लागू झाल्यानंतर महापालिकेची स्वायत्ता अबाधित राहिली पाहिजे. याची काळजी उद्धव ठाकरेंना आहे. महापालिकांना भिकेचे कटोरे घेऊन सरकारच्या दारी उभे राहण्याची वेळ येऊ नये असे उद्धव ठाकरे यांना वाटत आहे. म्हणूनच त्यांनी भाजप सरकारला याबाबत काही विचार करावा, अशा सूचना केल्या आहेत. सध्या त्यांचा सावध पवित्रा आहे.

जीएसटीचा अंतिम मसुदा बघितल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी शिवसेनेच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीतही स्पष्ट केले होते. आता त्यांची भूमिका वेट अँड वॉच अशी सुरू आहे. महापालिकेच्या मैदानातही शिवसेनेला खर्‍या अर्थाने यश मिळालेले नाही. केवळ दोन जागांनीच शिवसेना पुढे गेली. त्यामुळे भाजपची ताकद वाढल्याचेच दिसून आले. मुंबईतील मतदारांनी भाजपला भरभरून मते दिल्याने शिवसेना नेते विचारात पडले आहेत. शिवसेनेची ताकद पुन्हा वाढवण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी संपर्क अभियान राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेकडून भाजपवर टीकेची झोड उठवली जात आहे. दिल्लीत एनडीएच्या बैठकीत उद्धव ठाकरे उपस्थित राहिले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्‍वास असल्याच्या पत्रावर सहीही केली. असे असताना पुन्हा भाजप आणि पंतप्रधानांवर टीका सुरू केली. रामविलास पासवान यांनी उद्धव ठाकरे यांच्या या पवित्र्यावर चांगलीच टीका केली आणि उद्धव ठाकरे असे का करतात, असा प्रश्‍न उपस्थित केला. यातूनच शिवसेनेची दुटप्पी भूमिका उघडी पडली आहे. नाईलाज म्हणून समर्थनार्थ सह्या करायच्या आणि सत्ता गमावण्याच्या भीतीने पुन्हा भाजपलाच शिव्यांची लाखोली वाहायची हे सध्या सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना निवडणुकांसाठी तयार राहा, असे आदेश दिल्याच्या बातम्या बैठकीनंतर पसरल्या. शिवसेनेने निवडणुकांची तयारी सुरू केल्याचे दिसत आहेे. पण ही तयारी मध्यावधींसाठी नाही, तर 2019मध्ये होणार्‍या निवडणुकांसाठीच आहे. ही खरी सुरुवात भाजपनेच केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष पायाला चक्री लावून फिरत आहेत ते 2019 ला शतप्रतिशत भाजप सत्तेवर आणण्यासाठी. 2014 च्या निवडणुकीत मिळवलेले यश आणि त्यानंतर सातत्याने विजयाचा चढता आलेख भाजपला पुढे घेऊन जायचा आहे. मिनी विधानसभेच्या परीक्षेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पास झाले आहेत. ज्या ठिकाणी अपयश आले, कमतरता भासली त्या चुका भरून काढण्यासाठी व जिंकलेले गड आबाधित ठेवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. हे सारे पाहून पुन्हा आपला सुपडा साफ होऊ नये या भीतीने विरोधी पक्ष तयारीला लागले आहेत. असंतोष गोळा करत पुन्हा पक्षबांधणीच्या कामाला सारे लागले आहेत. याच प्रवात शिवसेनाही पक्षसंघटना मजबूत करण्याच्या मार्गावर आहे. मात्र, पुढच्या या तयारीत शिवसेना भाजपची मते घेणार नसून काँग्रेस राष्ट्रवादीच्याच मतांवर डल्ला मारणार आहे, हे ओळखल्याने काँग्रेस नेत्यांनी सेनेलाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांच्यातच खरी लढाई सुरू झाली आहे.