शेतकर्‍यांसाठी राष्ट्रवादी रस्त्यावर उतरून करणार आंदोलन

0

यवत । सरकारची कर्जमाफी म्हणजे ‘भीक नको पण कुत्रा आवर’ अशी झाली आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांवर गुन्हे आणि गोळीबार करण्याचे काम सरकारने केले आहे. मुख्यमंत्री हवेतून येतात आणि जातात. या आंदोलनातून त्यांना मातीवर आणण्याची आता वेळ आली आहे. या सरकारने संपकरी आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून मंत्र्यांच्या गाड्या अडवणार असल्याचे महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सांगितले. येत्या बुधवारी (दि.22) जिल्हाधिकारी कार्यालावर महिला राष्ट्रवादी धरणे आंदोलन करणार आहे. कानगाव येथील शेतकर्‍यांनी संपूर्ण कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव यांसह 11 मागण्यांसाठी (दि.2) बेमुदत संप पुकारला आहे. शनिवारी या आंदोलक शेतकर्‍यांची वाघ यांनी भेट घेतली.

आंदोलनाला पाठिंबा असल्याचे भाजप सांगत आहे, मग न्याय कुणाकडे मागायचा असा प्रश्‍न वाघ यांनी उपस्थित केला. राज्यव्यापी जनआक्रोश आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी शिंदेवाडी, गांडाळवाडी, गलांडवाडी व पारगांव ग्रामस्थांनी पारगांवमधील दुकाने व गाव बंद ठेवले होते. यावेळी पोपट ताकवणे, सयाजी ताकवणे, वसुधा सरदार, राजाभाऊ बोत्रे, संभाजी ताकवणे, अण्णा मगर, कैलास बोत्रे, धनाजी ताकवणे, टिळेकरगुरुजी, नामदेव काळे, सुरेश ताकवणे, संतोष ताकवणे, माधाभाऊ ताकवणे, नारायण शेळके, अमोल बोत्रे, सुनील शेळके, नितीन बोत्रे आदी उपस्थित होते.

उरुळी कांचनमधून बंदला पाठिंबा
शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व सरकारच्या निषेधार्थ उरुळी कांचन येथील ग्रामस्थांनी शनिवारी कडकडीत बंद पाळला आहे. त्याचबरोबर दौंडमधील पारगाव व नाथाचीवाडी येथील ग्रामस्थांनीही संपूर्ण गाव बंद ठेवत या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. शनिवारी (दि.18) सकाळपासून येथील बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. सर्वत्र शुकशुकाट आहे. या बंदमधून अत्यावश्यक हॉस्पिटल, मेडिकल, शाळा, महाविद्यालय यांना वगळण्यात आले. बंदला शेतकरी, छोटे-मोठे व्यापारी, व्यावसायिक सहभागी झाले. यावेळी पारगाव येथील ग्रामस्थांनी निषेध सभा घेतली.