धुळे । शिवसेना धुळे जिल्हा (ग्रामीण) ची बैठक शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख कारभारी आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदखेडा येथे संपन्न झाली. यावेळी शिवसेनेचे धुळे ग्रामीण जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, विधानसभा संघटक छोटू पाटील, तालुकाप्रमुख विश्वनाथ पाटील, विभागीय तालुकाप्रमुख कल्याण बागल, दोंडाईचा शहरप्रमुख चेतन राजपूत, माजी जि.प.सदस्य मंगेश पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सर्जेराव पाटील, महिला आघाडी तालुका संघटीका ज्योतीताई पाटील, उपजिल्हा युवाधिकारी गिरीष पाटील, तालुका युवाधिकारी मयुर निकम, उपतालुकाप्रमुख हिरालाल बोरसे, डॉ.प्रविण पाटील, राजू रगडे, राजू कोळी, शैलेश सोनार, विभागप्रमुख विजय सिसोदे, परमेश्वर वाल्हे सह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे म्हणून गावो-गावी जाऊन आवाज उठवा
नुकतेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक येथे शिवसेनेचे कृषी अधिवेशन पार पडले यावेळी पक्षप्रमुखांनी शिवसेनेच्या पदाधिकार्यांना शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे म्हणून गावो-गांवी जाऊन आवाज उठवा प्रसंगी रान पेटवा अशा प्रकारच्या सुचना केल्या. शेतकर्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे, शेतकरी पुर्णत: खचलेला आहे, अशा परिस्थितीत त्याला आधाराची गरज असून शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी गावा- गावांत जाऊन शेतकर्यांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त करा, त्यांना धीर द्या, लवकरच मी सुद्धा शेतकर्यांच्या भेटीसाठी येणार आहे व येत्या पावसाळी अधिवेशनात विधानभवनावर भव्य असा मोर्चा काढायचा असून प्रसंगी विधानभवनाला घेराव देखिल द्यावयाचा आहे त्यासाठी तयारी लागा अशा सुचना करण्यात आल्यात. त्याचाच भाग म्हणून शिवसेना धुळे जिल्हा (ग्रामीण) ची बैठक संपन्न झाली या बैठकीत शेतकरी कर्जमुक्ती संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
ठरविण्यात आली रणनीती
यावेळी रणनीती ठरविण्यात आली. त्यानुसार शिंदखेडा विधानसभा व शिरपूर विधानसभा मतदार संघातून मा.मुख्यमंत्री यांना गावा-गावांतून शेतकर्यांची पत्रे पाठवून कर्जमुक्तीचा संदेश मुख्यमंत्र्यापर्यंत पोहचवण्याचा निर्णय झाला. त्यासाठी शिंदखेडा मतदार संघातून एक लाख पत्र पाठविण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले. यावेळी धुळे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख यांनी शेतकर्यांबद्दल मनोगत व्यक्त करतांना म्हटले की, शिंदखेडा सह धुळे जिल्ह्यात शेतकर्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. मागील आठड्यांत शिंदखेड्यातील चार शेतकर्यांनी आत्महत्या केल्या, दिवसेंदिवस प्रमाण वाढतच आहे.
लोकांना शिवसेनेबद्दल विश्वास!
गावा-गावांत जाऊन पदाधिकार्यांनी शिवसेनेचे शेतकरी संपर्क अभियान राबवून शेतकर्यांच्या कर्जमुक्तीसाठी लढा उभा करा असे ते म्हणाले. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख कारभारी आहेर यांनी संघटनात्मक फेरबदलाचा आढावा घेतला व येणार्या काळात शिवसेनेचे नेते खा.संजय राऊत व सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील व संपर्कप्रमुख बबनराव थोरात हे लवकरच धुळे जिल्हा दौर्यावर येत असून त्याची माहिती विषद केली. भाजपाने अच्छे दिन चे गाजर दाखवून शेतकर्यांना नागवले, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस वर लोकांचा विश्वासच गमावला असल्याचे सांगत तालुकाप्रमुख पाटील यांनी प्रास्तविक केले.