शेतकर्‍याचा हरभरा चोरी होताच तासाभरात चोरटे फैजपूर पोलिसांच्या जाळ्यात

फैजपूर : यावल तालुक्यातील बामणोद येथे शेतकर्‍यांच्या शेतातून कापून ठेवलेला 14 हजार 400 रुपये किंमतीचा व तीन क्विंटल वजनाचा कोरडा हरभरा चोरट्यांनी लांबवला होता. फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी खबर्‍यांसह गोपनीय नेटवर्क अ‍ॅक्टीवेट करीत तासाभराच्या आत चोरट्यांचा शोध घेत कोरडा हरभरा परत मिळवला. फैजपूर पोलिसांच्या या कौतुकास्पद कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

चोरटे अडकले जाळ्यात
यावल तालुक्यातील बामणोद येथील शेतकरी राजेंद्र गोपाळ राणे (60) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास असून शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे आमोदा ते बामणोद रोडवर गट नंबर 180 मध्ये त्यांचे शेत आहे. त्यांनी शेतात हरभरा पिकाची पेरणी केली होती. सध्या हरभरा कापणीवर
आल्यानंतर त्यांनी हरभरा शेतात कापून ठेवला. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी तीन क्विंटल वजनाचा कापून केलेला कोरडा हरभरा चोरून नेला. सोमवार, 28 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शेतात गेल्यावर राजेंद्र राणे यांना हरभरा चोरून नेल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी तक्रार नोंदवली. फैजपूरचे सहाय्यक निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांनी गुन्हा दाखल करताच तपासचक्रे गतिमान करीत तासाभरातच चोरट्यांना शोधून काढत त्यांच्याकडून चोरी केलेला हरभरा जप्त केला. तपासाच्या कारणास्तव पोलिसांनी अद्याप चोरट्यांची नावे जाहीर केलेली नाहीत. पुढील तपास पोलिस नाईक किरण चाटे
करीत आहे.