कुडाळ – कुडाळ तालुक्यातील हिर्लोक-भटवाडी येथील न्हानू हरी परब (55) यांनी आपल्या आंब्याची पळण येथील शेतात आग घातली होती. भरदुपारी आगीने अचानक भडका घेतला आणि लगतच्या बागेला आगीने पेट घेताच ती आग विझवित असताना न्हानू परब यांना आगीने वेढल्यामुळे ते जागीच गतप्राण झाले. ही घटना मंगळवारी दुपारी 12 वा. च्या सुमारास घडली.
हिर्लोक भटवाडीतील रहिवाशी न्हानू हरी परब हे सकाळी ते आपल्या आंब्याची पळण येथील शेतावर गेले होते. पावसाळा जवळ आल्यामुळे आपल्या शेतातील पालापाचोळ्याला त्यांनी आग लावली होती. मात्र वातावरणातील वाढत्या उष्म्यामुळे त्या आगीने अचानक पेट घेत लगतच्या परिसराला कवेत घेतले. आगीचा भडका उडाल्यामुळे दुसर्याच्या झाडांना आगीचा धोका उद्भवू नये म्हणून त्यांनी जीवाच्या आकांताने आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. आग विझवित असतानाच वाढत्या उष्म्यात आगीने न्हानू परब यांना घेरल्यामुळे न्हानू परब यांचा जळून मृत्यू झाला. बराच वेळानंतर त्या जागी आलेल्या दुसर्या शेतकर्याने पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.