शेतकर्‍याची विष प्राशन करून आत्महत्या

0

जळगाव । दुबार पेरणी करूनही पावसाचा थांगपत्ता नाही, त्यातच कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. त्यामुळे सुनसगाव येथील नितीन विठ्ठल काटे(वय-30) या तरूणा शेतकर्‍याने रविवारी सकाळी 8.30 वाजता विषप्राशन केले. कुटूंबियांच्या घटना लक्षात येताच तरूणास लागलीच जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले परंतू उपचार घेत असतांना तरूण शेतकर्‍याचा मृत्यू झाला. नितीन काटे यांच्या पश्‍चात पत्नी, सायली व प्रांजली ह्या दोन मुली, आई-वडील, लहान भाऊ असा परिवार आहे.

फवारणी औषधाचे केले होते सेवन
नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, सुनसगाव येथील रहिवासी नितीन काटे हे पत्नी तसेच आई-वडील व दोन मुुलींसोबत राहत होते. तर शेती करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. परंतू शेतीवर घेतलेले कर्ज हे वाढत चालेले होते. यातच दुबार पेरणी करून सुध्दा पाऊस पडत नसल्याने नितीन हे चिंताग्रस्त झाले होते. रविवारी सकाळी 8.30 वाजता गावातच असलेल्या आपल्या एका प्लॉटवर नितीन हे निघून गेले. त्यानंतर त्यांनी फवारणीने औषध प्राशन करून जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. परिसरातील नागरिकांना व कुटूंबियांना घटना कळताच त्यांनी त्या ठिकाणी धाव घेत नितीन यांना लागलीच सुनसगावहून जळगावात जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ हलविले. दरम्यान, वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी केल्यानंतर नितीन यांच्या उपचार सुरू केले. यानंतर काही वेळातच उपचारा दरम्यान नितीन काटे यांचा मृत्यू झाला.