नंदुरबार तहसीलमधील घटना : सातबार्यावर बँकेचा बोजा न चढवल्याने राग अनावर
नंदुरबार- संतप्त झालेल्या एका शेतकर्याने नंदुरबार तहसील कार्यालयात जाऊन तलाठी आप्पांच्या कानशीलात लगावल्याने कर्मचार्यांमध्ये मोठी खळबळ उडाली. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. पत्नी व मुलाच्या नावावर असलेल्या शेतजमिनीवर बँकेचा बोजा का चढविला नाही? या कारणावरून संतप्त झालेले तालुक्यातील कलमाडी येथील शेतकरी मच्छिंद्र तानाजी पाटील यांनी तलाठी बालाजी हनुमंत राव बिडगर यांच्या कानशिलात लगावली. या घटनेने तहसील कार्यालयात खळबळ उडाली आहे. याबाबत तलाठी बालाजी बिडगर यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पाटील यांनी दारूच्या नशेत आपल्याला गालावर मारहाण केली असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार शेतकरी मच्छिंद्र पाटील यांच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.