जळगाव। तालुक्यातील नांद्रा बुद्रुक येथील शेतकरी कैलास रामदास पाटील यांच्या मोबाईलवर हॅलो..! मी स्टेट बँकेचा अधिकारी बोलतोय’ असे सांगत एटीएम’चा पिनकोड नंबर विचारून त्यांच्या खात्यातील रकमेची विल्हेवाट लावल्याचे प्रकरण समोर आले आहे. संबंधित शेतकर्याने नुकतीच कापसाच्या पेमेंटपोटी मिळालेली रक्कम खात्यात जमा केल्यानंतर भामट्याने 36 वेळा ऑनलाइन ट्रान्झिक्शन करून 2 लाख 37 हजार रुपयांची विल्हेवाट लावली.
भामट्याने 36 वेळा केले व्यवहार
तालुक्यातील नांद्रा बुद्रुक येथील शेतकरी कैलास पाटील यांच्या भारतीय स्टेट बँकेतील खात्यातून 1 ते 14 जुलै 2017 दरम्यान 36 वेळा ट्रान्झिक्शन करून भामट्याने रकमेची विल्हेवाट लावली. श्री. पाटील यांनी नुकताच विकलेल्या कापसाचा मिळालेला एक लाख 84 हजार रुपयांचा धनादेश त्यांनी खात्यात जमा केला होता. ही रक्कमही भामट्याने खात्यातून काढून घेतली. खात्यातील सर्व रकमेची विल्हेवाट लावली गेल्याचे त्यांना कळालेच नाही. बँकेत जाऊन खात्यावरील शिल्लक रक्कम तपासून पाहिली असता त्यांना घडलेला प्रकार माहीत झाला. एक जुलैपासून 14 जुलै 2017 पर्यंत एक-दोन दिवसांआड संबंधित भामटा ऑनलाइन खरेदी करीत होता. खरेदी झाल्यावर त्याचे मेसेज श्री. पाटील यांच्या मोबाईलवर येत होते. मात्र, त्यांनी त्याकडे विविध मोबाईल कंपन्यांचे मेसेज म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, बँक खाते संपूर्णपणे स्वच्छ झाल्यावर त्यांचे डोळे उघडले. नंतर त्यांनी एटीएम कार्ड ब्लॉक केले व पोलिसांत तक्रार दिली