शेतकऱ्यांकडून वीजबिल वसुली होईना!

0

केवळ ८ टक्केच वीज बिल वसुली; २२ हजार ८९१ कोटी रुपयांचे वीजबिल थकीत
कनेक्शन कट न करण्याच्या निर्णयामुळे होईना वसुली
किमान ५ हजार तरी भरा; ऊर्जामंत्र्यांचे शेतकऱ्यांना पुन्हा आवाहन

मुंबई (निलेश झालटे):- राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या स्थगित बिलाची वसुली करणे सरकारला अतिशय कठीण जात असून आतापर्यंत केवळ ८ टक्केच बिलवसुली झाल्याची माहिती उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. राज्यातील जवळपास ४० लाख शेतकऱ्यांकडे २२ हजार ८९१ कोटी रुपयांचे वीजबिल थकीत आहे. यामध्ये मुद्दल १३,१७८ कोटी तर व्याज ९७१२ कोटी असल्याची माहिती त्यांनी दिली. शेतकऱ्यांनी किमान ५ हजार रुपये तरी भरावे असे आवाहन यावेळी ऊर्जामंत्र्यांनी केले. तसेच वीज कनेक्शन डिस्कनेक्ट करून ५ हजार वसूल करणे सोपे आहे मात्र मुख्यमंत्र्यांनी डिस्कनेक्ट करू नका असा आदेश दिला आहे. आम्हाला जबरदस्ती करता येते पण हुकूमशाहीचे निर्णय घेऊ शकत नाही. हुकुमशाही करण्यापेक्षा आम्ही आवाहन करतोय असे उर्जामंत्री यावेळी म्हणाले.

सबसिडी भरूनही वीजबिल थकीत
शेतकऱ्यांना कंपनीकडून ६ रुपये युनिटने वीज मिळते. यापैकी शेतकऱ्यांकडून प्रतियुनिट १.५० रुपये फक्त घेतले जातात. 4.३० रुपये प्रतियुनिट सबसिडी सरकार भरते. तरीही एवढ्या मोठ्या प्रमाणात बिल थकीत असल्याची माहिती ऊर्जामंत्र्यांनी दिली. आपापल्या क्षेत्रातील वीजबिल वसुलीसंदर्भात मी आमदारांना पत्र लिहिली तर त्यावरही टीका झाल्याचे ऊर्जामंत्र्यांनी सांगितले. वीज कनेक्शन कट न करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला असल्याने वीज बिलाची वसुली कितपत यशस्वी होतेय याकडे आता लक्ष लागून आहे.

खानदेशात जळगाव जिल्हा आघाडीवर
प्रशासकीय विभागानुसार विदर्भात २०२६ कोटी मुद्दल तर व्याजासह ३६७२ कोटी, मराठवाडा ४१९२ कोटी मुद्दल तर व्याजासह ८०९४ कोटी, कोकण फक्त ७.९९ कोटी तर उर्वरित महाराष्ट्र ११ हजार ११६ कोटी रुपयांचे वीजबिल थकीत आहे. खान्देशामध्ये जळगाव जिल्ह्यात १,९२७८१ शेतकऱ्यांकडे १७९१ कोटी रुपयांचे वीजबिल थकीत आहे. धुळे जिल्ह्यात ६८४ कोटी तर नंदुरबार जिल्ह्यात ४०८ कोटी रुपयांचे वीजबिल थकीत असल्याची माहिती आहे. पुणे जिल्ह्यात 2,४८,५९१ शेतकऱ्यांचे ११०८ कोटी रुपयांचे वीजबिल थकीत आहे. राज्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक २५५७ कोटी रुपयांचे वीजबिल थकीत आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात कमी 10 लाख रुपये वीजबिल थकीत आहे.

राज्यात लोडशेडिंग नाही
यावेळी कृषी कनेक्शन वगळता राज्यात इतर कुठल्याही क्षेत्रात लोडशेडिंग नसल्याचे ऊर्जामंत्र्यांनी सांगितले. ७०० फीडर्सवर शेती आणि गाव एकाच लाईनवर आहेत त्यामुळे तिथे लोडशेडिंग आहे. त्या ठिकाणी शेती आणि गाव वेगवेगळे करण्यासाठी दीनदयाळ उपाध्याय योजना सुरु करणार असल्याचे ते म्हणाले. राज्यात २४ तास पाणी ओढणे हिताचे नाही. त्यामुळे डार्क शेड तयार होत असल्याने शेतकऱ्यांना ८ तास वीज दिली जात असल्याचे बावनकुळे म्हणाले.