शेतकऱ्यांचा अपमान आता देश सहन करणार नाही – राहुल गांधी

0

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचा अपमान करु नये. शेतकऱ्यांकडे काळा पैसा होता, असे सांगून मोदी त्यांचा अपमान करत आहे. शेतकऱ्यांचा हा अपमान आता देश सहन करणार नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

छत्तीसगडमधील सभेत काळा पैशावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला चिमटा काढला होता. काही लोक गादीखाली पैसे ठेवून झोपायचे, कोणी घरातील भांड्यात पैसे ठेवायचे, कोणी गोणीत तर कोणी गहूखाली पैसे लपवून ठेवायचे, असे मोदींनी म्हटले होते. नोटाबंदीचे समर्थन करताना त्यांनी हे वक्तव्य केले होते.

राहुल गांधी यांनी ही व्हिडिओ क्लिप शेअर करत नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांचा दाखला देत मोदींवर निशाणा साधला. ‘तुम्ही कधी विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी, नीरव मोदी यांना गहूचे पिक घेताना पाहिले आहे का?, तुम्ही आधी नोटाबंदीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांचा पैसा सूटबूटवाल्या मित्रांच्या खिशात टाकला. आता तुम्ही सांगताय की शेतकऱ्यांकडे काळा पैसा होता. शेतकऱ्यांचा हा अपमान देश सहन करणार नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.