शेतकऱ्यांचा संप फोडण्यासाठी शेतकरी नेत्यांची सेटलमेंट

0

मुंबई : शेतकऱ्यांचा संप फोडण्यासाठी काही माणसे पेरण्यात आली. सरकारची त्याला फूस होती. शेतकरी नेत्यांनी सेटलमेंट केली असा सनसनाटी आरोप महाराष्ट्र राज्य किसान सभेचे नेते डॉ अजित नवले यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. शेतकऱ्यांच्या संप मिटला नसून, येत्या ८ जूनला आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी शेतकऱ्यांचा मेळावा घेण्यात येणार आहे असेही नवले यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी मध्यरात्री वर्षा बंगल्यावर शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली. या चर्चेनंतर संप मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. मात्र महाराष्ट्र राज्य किसान सभा संपावर अजूनही ठाम आहे. त्याची माहिती सांगण्यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. नवले म्हणाले कि, मी स्वतः या बैठकीत होतो. मात्र चर्चेत कर्जमाफी आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे पावणे चार वाजता आम्ही बैठकीतुन बाहेर पडलो. मुख्यमंत्र्यांनी शेतकरी सदस्यांना गुंडाळलं असा आरोप नवले यांनी केला. वर्षा बंगल्यावर बैठक होण्या अगोदर शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी आणि सतीश गीते हे सदाभाऊ खोत यांच्या बंगल्यावर गेले होते. त्याठिकाणी यांची सेटलमेंट झाली. संप फोडण्यासाठी माणसे पेरण्यात आली होती. असाही आरोप त्यांनी केला. पुणतांब्याचे आंदोलन या दोघांनी हायजॅक केल्याचा आरोप नवले यांनी केला. अल्पभूधारक थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफीवर कार्यवाही केली जाईल.या कर्जमाफीसंदर्भात अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्यात येईलअशी आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिली आहेत. पण याचा फायदा विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना होणार नाही. पश्चिम महाराष्ट्रात अल्पभू धारक शेतकरी दरवर्षी कर्ज नूतनीकरण करतो. त्यामुळे अल्प भूधारक शेतकऱ्यांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे या सगळ्या भुथापा आहेत असेही नवले म्हणाले. शेतकरी संपाच्या आंदोलनात एकूण २८ संघटना होत्या. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत प्रत्येक संघटनेचा प्रतिनिधीचे शिष्टमंडळ बोलवायला हवे होते पण तसे झाले नाही. संप मागे घेण्यात आल्याच्या घोषणेने शेतकर्यांमध्ये संभ्रम आहे. संपावर विपरीत परिणाम झाला असून , विस्कळीतपणा आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधील संभ्रम दूर करण्यासाठी काही दिवस लागणार आहेत. त्यामुळे येत्या ४ दिवसात मोर्चे, आंदोलन आणि निदर्शने करण्यात येणार आहे. येत्या ५ जून रोजी मुंबई वगळता राज्यात बंदची हाक देण्यात आली आहे. पण बंदची घोषणा देणाऱ्यांनी सेटलमेंट केली आहे तरीसुद्धा ज्याठिकाणी बंद होईल, ठीकाणी महाराष्ट्र किसान किसान सभेचा पाठिंबा राहणार आहे असे अशोक ढवळे यांनी स्पष्ट केले.