शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून पुन्हा विरोधक आक्रमक

0

मुंबई – शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची उघड व आक्रमक मागणी तर सत्ताधारी शिवसेनेची बाकांवर बसून मौन साधत केलेल्या मागणीनंतर शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी जोरदार गदारोळ झाला. विरोधी पक्षांचे सदस्य आक्रमक राहिल्यामुळे अखेर विधान परिषदेचे कामकाज सुरूवातीला एक तास व नंतर दिवसभरासाठी तहकूब झाले.

कामकाज सुरू होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य सुनील तटकरे यांनी स्थगन प्रस्तावाच्या सूचनेद्वारे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी केली. वित्तमंत्र्यांनी केलेल्या आरोपाचा उल्लेख करून ते म्हणाले की, वित्तमंत्री मुनगंटीवार म्हणतात की, आम्हाला फायदा व्हावा म्हणून आम्ही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी मागतो. मग, फडणवीस सरकारने केलेल्या सावकारी कर्जमाफीने कुणाला फायदा झाला? विदर्भातले सावकार नेमके कुठल्या पक्षाचे होते, याचाही खुलासा व्हावा, असे तटकरे म्हणाले. बँकांची कर्जमाफी म्हणता तर तुम्ही पेटीएममार्फत कर्जमाफी देणार आहात का, असा सवालही त्यांनी केला.

सभागृहाचे नेते व राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. आम्ही कर्जमाफीला तयार आहोत. मात्र, शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज काढावे लागू नये, असा सरकारचा प्रयत्न आहे. वीजजोडणी, ठिंबक सिंचनावर अनुदान, स्वस्त बियाणे, जलयुक्त शिवार, अशा वेगवेगळ्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहे. पिकविम्यापोटी सरकारने आतापर्यंत ४२०० कोटी रूपये भरले आहेत. आघाडी सरकारने त्यांच्या काळात १५ वर्षांत शेतीवर केवळ १३ हजार कोटी खर्च केले होते. आमच्या फडणवीस सरकारने एका वर्षात शेतीत २५ हजार कोटींची गुंतवणूक केली आहे, असे त्यांनी सांगितले.

परंतु, पाटील यांच्या खुलाशाने विरोधकांचं समाधान झालं नाही. विरोधक सभापतींच्या आसनासमोर येऊन कर्जमाफी झालीच पाहिजे, अशा घोषणा देऊ लागले. यह अंदर की बात है, शिवसेना हमारे साथ है, अशा घोषणा होऊ लागल्या. शिवसेनेचे सदस्य मात्र आज तटस्थ राहिले. सरकारमध्ये असूनही त्यांनी सरकारची बाजू घेतली नाही. पण जाहीर विरोधही त्यांनी केला नाही. गदारोळ वाढल्याने सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सभागृहाचे कामकाज एक तासासाठी तहकूब केले.

सभागृहातले कामकाज पुन्हा सुरू झाले तेव्हा उपसभापती माणिकराव ठाकरे सभास्थानी होते. त्यांनी विषयपत्रिकेवरील कामकाज पुकारले. संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट बोलत असतानाच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बोलण्याची परवानगी मागितली. त्यानंतर विरोधी पक्षनेते मुंडे बोलू लागले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची आम्ही गेल्या सात अधिवेशनात मागणी करत आहोत. पण, सरकार ढीम्म आहे. सरकार म्हणते की, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढले पाहिजे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांचे उत्पन्न तीन पटीने वाढले आहे. पण, त्यांना, त्यांच्या शेतमालाला भावच मिळत नाही. तुम्ही सावकारांचे कर्ज माफ केले. काँग्रेस, राष्ट्रवादीला फायदा होईल म्हणून तुम्ही शेतकऱ्यांची पर्यायाने बँकांची कर्ज माफ करत नाही. मग, राष्ट्रीयीकृत बँकांची कर्ज माफ केल्याने केंद्रातले अर्थमंत्री अरूण जेटली यांना याचा फायदा होणार, असे आम्ही म्हणायचे का, असा सवाल त्यांनी केला.

काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे म्हणाले की, अभिभाषणात राज्यपाल म्हणतात- राज्याला शाश्वत शेतीची गरज आहे. शाश्वत शेती करायची असेल तर शेतकऱ्यांची कर्जमाफी महत्त्वाची आहे. त्यामुळं सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी. त्यांचे भाषण सुरू असतानाच काँग्रेस व राष्ट्रवादीचे सदस्य सभापतींसमोरच्या मोकळ्या जागेत जाऊन घोषणाबाजी सुरू केली. हा गदारोळ सुरू असतानाच सभागृहाचे नेते चंद्रकांत पाटील आणि संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी पुढचे कामकाज घेण्याची विनंती केली. त्यामुळे विरोधक आणखी आक्रमक झाले. त्यांची घोषणाबाजी आणखी वाढली. या गदारोळातच उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.