मंत्री सुभाष देशमुख यांचा विरोधकांवर हल्लाबोल
निलेश झालटे, नागपूर: विरोधकांनी २९३ च्या प्रस्तावामध्ये सहकार विभागावर सडकून टीका केल्यानंतर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा रुद्रावतार बुधवारी विधानसभेत पाहायला मिळाला. कर्जमाफीच्या अंलबजावणीवर विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी जोरदार हल्लाबोल केला. विरोधकांच्या सहकारी साखर कारखाने व जिल्हा सहकारी बॅंका यांच्यातल्या संगनमताने हजारो कोटी रूपयांची कर्जे साखर कारखान्यांना वाटप करण्यात आली. ती कर्जे कारखान्यांनी बुडवली. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज वाटपात अडचणी आल्याचा प्रतिहल्ला चढवला.
सहकार मंत्र्यांनी विरोधकांवर शरसंघान साधताना म्हटले कि, तुमच्या काळात कुणी साखर कारखाने काढू नयेत अशी धूर्त भूमिका होती. पण, अटलबिहारी वाजपेयी यांनी 15 किलोमीटरची अट काढली म्हणून मी कारखाना काढू शकलो. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना झोनबंदी लागू करून तुम्ही शेतकऱ्यांना लाचारी पत्करायला लावली. गोपीनाथ मुंडेंनी ही झोनबंदी उठवली आणि शेतकरी कुठेही ऊस घालू लागला. यावर सेबीने सुभाष देशमुख यांच्या कारखान्याला नोटीस काढल्याचा दाखला विरोधी पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी दिला. त्यावर देशमुख यांनी सेबीच्या निर्देशानुसार एकाही शेतकर्याची मी दमडी बुडणार नाही. असा खुलासा केला. दरम्यान राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या जिल्हा बँकांवर सहकारमंत्र्यांनी जोरदार हल्ला चढवला. सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील साखर कारखान्याची थकीत कर्ज त्यांनी यावेळी जाहीर केली.
‘देशमुखांत’ काडी टाकण्याचा अजित पवारांचा प्रयत्न!
– सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि राज्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. विधानसभेत या दोन देशमुखांमध्ये काडी टाकण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी केला, मात्र विजय देशमुख यांनी तो प्रयत्न निष्फळ ठरविला. दरम्यान सोलापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या पॅनेलचा पालकमंत्री विजय देशमुख याच्या पॅनेलनं पराभव केल्याची जुगलबंदी विधानसभेत रंगली. सहकारी बॅकेतल्या बुडीत कर्जावर राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सुभाष देशमुख हल्लाबोल करत असताना अजित पवार यांनी बाजार समितीत पराभव झाला ना ? तुमचेच पालकमंत्री विजयरावांनी मला सांगितले. अशी कोटी केली. त्यावर विजय देशमुख यांनी मला फक्त तुम्ही स्वत: उभारले होते का ? एवढाच सवाल दादांनी केला होता, असा खुलासा केला. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. पण सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आमच्या पालकमंत्र्यांना या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी भुरळ कशी घातली हे कळत नाही. मी भाजपच्या कार्यकर्त्याला निवडणूकीत उतरवले होते. सगळ्यांनी मिळून पराभव केला. पण मी पराभव मानत नाही. पराभव काॅग्रेस राष्ट्रवादीचा झालायं. जिंकलाय तो भाजपचाच कार्यकर्ता जिंकलाय. अशी कोटी करत विरोधकांना डिवचले. या आरोप प्रत्यारोपाने परस्परांचे राजकिय प्रतिस्पर्धी असलेले दोन्ही देशमुख मात्र एकमेकांकडे पाहत दिलखुलास हसले.