मुंबई: राज्यात ओला दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला आहे. ज्वारी, मका, सोयाबीन, बाजरी, कापसाचे पिक वाया गेले आहे. दरम्यान महाराष्ट्रात सरकार स्थापनेच्या हालचालीत शेतकरी वर्ग दुर्लक्षित होत असल्याने केंद्र सरकारने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना उभारी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
महाराष्ट्रात नवीन सरकारची औपचारिकता पूर्ण होण्याची वाट न पाहता केंद्र सरकारने तातडीने मदत जाहीर करावी. शेतकऱ्यांना नव्याने उभे करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. लवकर मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. अतिवृष्टीमुळे राज्यातील असंख्य शेतकऱ्यांचे पीक वाया गेले आहे, त्यामुळे ऐन दिवाळीच्या सणात शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले असून, शेतकरी व्याकूळ झाला आहे. या शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा मिळावा अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे.