मुंबई: ऐन सणासुदीच्या काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यात पूरपरिस्थिती ओढवल्याने कांदा उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यात खरिपातील कांदा अजून बाजार न आल्याने कांद्याच्या किंमती दिवसेंदिवस वाढत असून, दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने कांदा निर्यातीवर बंदी आणली आहे.
सध्या देशभरात कांद्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. राज्यातील अनेक भागात उद्भवलेल्या पूरपरिस्थिमुळे अनेक पिकांवर याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे जूनमध्ये होणारी लागवड सप्टेंबर मध्ये करण्यात आली. या कांद्याची आवक ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता ऐन सणासुदीत कांद्याच्या किंमतीने शंभरीकडे वाटचाल सुरू केली होती. कांद्याच्या उत्पादनाला फटका बसल्याने त्याचा परिणाम आता जाणवू लागला असून, बाजारात कांद्याचे भाव ४५ ते ५० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.