शेतकऱ्यांना मदत, भूमिपुत्रांना नोकरीत आरक्षण देणार; राज्यपालांचे आश्वासन

0

मुंबई : विधानसभा अध्यक्ष, विरोधी पक्षनेता निवडीनंतर आज रविवारी १ डिसेंबर रोजी विधानसभेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे अभिभाषण झाले. आज विधानसभेत राज्यपालांनी मराठीतून भाषण केले. यावेळी त्यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या आणि महापुरामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा मांडला. पाऊस लहरी झाल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. या शेतकऱ्यांना तत्काळ सहाय्य देण्यासाठी शासन वचनबद्ध असेल. आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन राज्यपालांनी दिले. शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान झाले आहे. शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. बेरोजगारांना नोकऱ्या उत्पन्न करण्यासाठी प्रयत्न होतील.

नोकरी आणि रोजगारामध्ये भूमीपुत्रांना स्थान मिळावे यासाठी आम्ही कायदा करणार आहोत असे आश्वासन राज्यपालांनी दिले. महिलांच्या सुरक्षेसाठी सर्व उपाययोजना केल्या जातील. आर्थिक दृष्ट्या दुर्बल मुलींसाठी शिक्षण, रोजगार देण्यासाठी प्रयत्न करील. वसतीगृहे बांधण्यासाठी प्रयत्न करेल, असे राज्यपालांनी सांगितले.

राज्यातील आठ लाख बचत गटांना कौशल्यविकास, मदत यासाठी प्रयत्न केले जातील. शिक्षणाच्या दर्जामध्ये सुधारणा केली जाईल. आरोग्य, शिक्षण, विकासावर लक्ष केंद्रीत केले जाईल. नगरपरिषदा, नगरपालिका यांच्यासाठी मुख्यमंत्री रस्ते निर्माण योजना, झोपडपट्टी पुनर्वसन आदी योजना राबवेल. परवडण्यायोग्य वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये आदी निर्माण करेल, असे राज्यपाल म्हणाले.