मुंबई – तत्वतः, अटी, शर्ती अशा शब्द जंजाळात शेतकऱ्यांना न फसवता सरसकट कर्जमाफी द्यावी. सरकारने घोषणा केल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज आणि कृषी पूरक कर्ज सरसकट माफ करावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी बुधवारी केली.
यासंबंधातली आपली भूमिका काँग्रेस लवकरच सरकारला लेखी कळवेल, असेही ते म्हणाले. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यसरकारतर्फे अशोक चव्हाण यांची भेट घेऊन कर्जमाफीसंदर्भात चर्चा केली होती. याबाबत चर्चा करण्यासाठी बुधवारी दादरच्या टिळक भवन काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना चव्हाण यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली.
सरकारने घोषणा केल्याप्रमाणे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. अटी व शर्ती घालून अनेक शेतकऱ्यांना वगळण्याचा घाट सरकारने घातला आहे. कर्जमाफीसाठी जमिनीच्या क्षेत्राची किंवा कर्जाच्या रकमेची मर्यादा सरकारने घालू नये. मराठवाडा आणि विदर्भात बहुसंख्य शेतकऱ्यांचे क्षेत्र हे पाच एकरांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे जमीन क्षेत्राची मर्यादा घातली तर बहुसंख्य शेतकरी वगळले जातील, असे ते म्हणाले. अल्पभूधारक शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली असून त्यांना तत्काळ नवीन कर्ज मिळेल अशी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली होती. मात्र यासंदर्भात सरकारने शासन निर्णय काढला नाही. बँकांना लेखी आदेश दिले नाहीत. अनेक शेतकऱ्यांनी बँकेमध्ये जाऊन नविन कर्जाबाबत विचारणा केली. मात्र, बँकेने आम्हाला सरकारकडून लेखी आदेश नाहीत, असे सांगितले. त्यामुळे सरकारने तत्काळ सर्व शेतकऱ्यांना बेबाकी प्रमाणपत्र देऊन त्यांना तत्काळ नविन कर्ज उपलब्ध करून देण्याचे आदेश द्यावेत. पेरणीसाठी शेतकऱ्यांना 10 हजार रूपये मदत देण्याची घोषणा केली आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णय अद्याप काढला गेलेला नाही. सरकारने सरसकट 10 हजार रूपये देण्यापेक्षा शेतकऱ्यांना पेरणीसाठी प्रतिएकर मदत द्यावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली. या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, रोहिदास पाटील, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, शरद रणपिसे, नसीम खान, डी. पी. सावंत, राजेंद्र मुळक, चंद्रकांत रघुवंशी, विरेंद्र जगताप, अमर काळे, चारूलता टोकस, सचिन सावंत, गणेश पाटील, पृथ्वीराज साठे, राजू वाघमारे आदी उपस्थित होते.