शेतकऱ्यांना २५ टक्के कर्ज रोख स्वरूपात मिळणार

0

जळगाव– कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्ज वाटप करताना नोटांद्वारे संपर्क येऊ नये म्हणून कर्जाची २५ टक्के रक्कम रोख स्वरूपात देऊन उर्वरित ७५ टक्के रक्कम कार्डद्वारे देण्याचा निर्णय आज एका बैठकीत घेण्यात आला. शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटपासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली बँक अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, लीड बँकेचे मॅनेजर अरुण प्रकाश, स्टेट बँकेचे अधिकारी महेश पाटील यांच्यासह बँकांचे अधिकारी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नोटांची हाताळणी करताना एकमेकाचा संपर्क येऊ नये म्हणून कर्ज वाटप करताना कर्जाची २५ टक्के रक्कम रोख स्वरूपात तर उर्वरित ७५ टक्के रक्कम ही कार्डद्वारे देण्यात येणार आहे. दरम्यान जिल्हा बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि संचालक मंडळ यांच्यातर्फे बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी स्टेट बँकेकडे ४०० कोटी रुपयांची मागणी केली आहे. ही रक्कम टप्प्याटप्प्याने जिल्हा बँकेला उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर ढाकणे यांनी दिले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सद्यस्थितीला पीक कर्ज वाटप सुरू आहे. एकही शेतकरी कर्जापासून वंचित राहणार नसल्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी सांगितले.