मुंबई | ग्राहक सध्या किरकोळ बाजारात कोथिंबिर खरेदीसाठी मोजत असलेले पैसे आणि व्यापारी बांधावरून खरेदी करत असतांना त्यांना देत असलेला दर यातील तफावतीची जाणीव करुन देण्यासाठी बुधवारी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोथिंबिरीची भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी ती घरी घेऊन जावी आणि स्वयंपाकात वापरायला सांगावी, असा चिमटाही या शेतकऱ्यांनी काढला.
पन्हाळा तालुक्यातील किसरोळ गावचे हे शेतकरी ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या संवाद कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. हीच जाणीव त्यांनी यापूर्वी अशाच पद्धतीने पृथ्वीराज चव्हाण राधाकृष्ण विखे पाटील, विलासराव देशमुख यांनाही करून दिली आहे.
काय केल्या मागण्या
१. सेंद्रीय शेतीच्या धोरणात आमूलाग्र बदल करावा, म्हणजे शेतीवरील भार कमी होईल.
२. ज्या-ज्या भागात, जो-जो माल पिकतो, त्या-त्या मालावर त्याच विभागात प्रक्रिया सेंटर व्हावे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वाहतूक खर्चात बदल होईल व मालाची नासधूस थांबेल.
३. चांगल्या शेतीमालावर प्रक्रीया झाल्यामुळे त्या मालाचा भाव वाढेल आणि स्थानिक ठिकाणीच शेतकऱ्यांचा फायदा होईल.
४. त्या-त्या भागातच शेतमालाचे मूल्यवर्धन करावे, त्यावर आधारित भाव मिळाला तर शेतकऱ्यांच्या कष्टाला न्याय मिळेल.
650 वरून 40 रुपये भाव
दोन वर्षांपूर्वी 10 किलो आल्याचा भाव 400-450 ते 650 रुपयांपर्यंत होता. या वर्षी डिसेंबर ते मेपर्यंत भाव अवघा 40 ते 60 रुपये आहे. शेतमाल दराची अनिश्चितता, त्यातून बारदान, काढणी हा खर्च देखील भागत नाही. 7 ते 8 टन एकरात आल्याचे उत्पादन होते; पण बाजार अनिश्चीत असल्याने हमीभाव नसल्याने सगळेच पीक मातीमोल होते.
कर्जमाफीसंदर्भात…
सरसकट, सर्वसामान्य शेतकरी नवे-जुने करुन दरवर्षाला सोसायटी, बॅंकामधे कर्जाचे पुनर्गठन करुन घेतात. त्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा लाभ कमी प्रमाणातच झालाय.