कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना आवाहन
मुंबई:- १० जून पासून पावसाला सुरूवात होणार असली तरी १२ तारखेनंतर पावसामध्ये खंड पडण्याचा अंदाज आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी करत असतांना घाई करू नये. योग्य पावसाची वाट पाहून नंतरच खरीपाची पेरणी करावी असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्यात १० जून ते १२ जून पर्यंत पाऊस पडणार आहे. त्यानंतर १२ जून नंतर काही काळ पावसात खंड राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये. १२ जूनपर्यंत विदर्भ, मराठवाड्यात मान्सूनपूर्वीचा वादळी पाऊस पडेल. अशीच स्थिती मध्य महाराष्ट्रात असेल. ढगाळ वातावरण राहणार असल्याने तापमानात घट होईल. परंतू दि. 12 तारखेनंतर पुन्हा तापमान वाढण्याची शक्यता आहे.
१० जूनपर्यंत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे या भागात दि. ८ ते ९ जून या काळात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईत सुद्धा दि. ९ आणि १० जून रोजी मुसळधार पाऊस असेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे.