औरंगाबाद: परतीच्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात थैमान घातले आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे औरंगाबाद जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. आज तुमच्यावर जी परिस्थती आली आहे, त्यातून बाहेर काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. या परिस्थितीत आत्महत्येचा कोणीही विचार करू नका हा शब्द मला द्या, असे सांगत तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही असा शब्द शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला.
या वाईट परिस्थितीत शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. जे काही शक्य आहे ते तुमच्यासाठी करणार हा शब्द देण्यासाठी मी आलो आहे. आजपर्यंत तुम्ही आम्हाला भरभरून दिले आहे, या निवडणुकीत देखील मतदानरुपी आशीर्वाद तुम्ही आम्हाला दिले आहे. आता तुम्हाला काही तरी देण्याची वेळ आमची आहे. त्यात कोठेही कमतरता पडणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो, फक्त कोणीही आत्महत्येचा विचार करू नका हा शब्द मला द्या असे भावनिक आवाहन उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केले.
सरकार कोणाचे येईल, मुख्यमंत्री कोण होईल? याचा विचार तुम्ही करू नका. जे होईल ते योग्य होईल. राज्यात ओला दुष्काळ जाहीर व्हावा यासाठी प्रयत्न करू. १० हजार कोटींची मदत अपुरी आहे परंतु त्यापलीकडे देखील देण्यासाठी प्रयत्न करू. केंद्रात मोदी सरकार आणण्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे, त्यामुळे केंद्राकडून अधिक मदतीची अपेक्षा आहे, ती मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू असे देखील उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मदत देताना कागदपात्रांची अट कोणीही घालणार नाही, तुम्ही आम्हाला मत देताना कागदपत्रे मागितली होती का? आता तुम्हाला मदत करायची आहे, तेंव्हा तुमच्याकडून कोणीही कागदपत्राची अट घालणार नाही हा शब्द देखील देतो असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.