शेतकऱ्यांसाठी सदाभाऊंची ‘स्वाभिमानी किसान संघटना’!

0

मुंबई : ‘या पुढे झेंडा आपला, दांडा आपला आणि दोरीही आपलीच’ असे म्हणत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आपली वेगळी चूल मांडण्याचे स्पष्ट संकेत पुण्यात दिले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढण्यासाठी ‘स्वभिमानी किसान संघटना’ अशा नावाची नवी संघटना सदाभाऊ स्थापणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ऑगस्ट महिन्यापासून राज्यभर दौरा करू आणि त्यानंतर कार्यकर्त्यांचे शिबीर घेऊ. स्वतंत्र संघटना उभारावी ही कार्यकर्त्यांची मागणी आहे. तुम्ही कार्यकर्तेच मायबाप आहात. तुमच्यामुळेच खुर्चीत बसलोय. मी संघटनेच्या विरोधात कुठलंही काम केलेलं नाही, असे सांगत सदाभाऊंनी कार्यकर्त्यांना भावनिक आव्हान करत नव्या संघटनेचे बिगुलच वाजविले आहे.

शेट्टींवर पलटवार
पुण्यात चौकशी समितीला सामोरे जाण्यापूर्वी कार्यकर्त्यांशी बोलताना संघटनेपासून विभक्त होण्याचे सांगितले तर दुसरीकडे आपण चर्चेला आणि संवादाला तयार आहोत, आता निर्णय पक्षनेतृत्वाने घ्यावयाचा आहे, असे सांगत खासदार राजू शेट्टी यांच्या कोर्टात चेंडू टाकला आहे. आपण यापुढे कोणत्याही चौकशी समितीसमोर जाणार नसल्याचेही यावेळी खोत यांनी सांगितले. संघटनेशी आपण कुठलाही द्रोह केला नसल्याचा दावा करत सदाभाऊ यांनी शेट्टी यांच्यावरच ताशेरे ओढत कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केले. दरम्यान सदाभाऊ यांच्या आगमनानंतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

नव्या संघटनेत कोण?
दरम्यान आता स्वभिमानीशी फारकत अंतिम टप्यात आहे. त्यामुळे नव्या संघटनेच्या स्थापनेवर सदाभाऊंचे लक्ष आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वाभिमानाच्या नावाशी साधर्म्य असणारी ही नवी संघटना काढणार असल्याचे वृत्त जनशक्तिने आधीच प्रकाशित केले होते. गेल्या काही दिवसांपासून ते नव्या संघटनेच्या स्थापनेबाबत व्यूहरचना करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या नव्या संघटनेत कर्जमाफीच्या आंदोलनात सरकारशी तडजोड करून टीकेचे धनी झालेले जयाजी सूर्यवंशी, संदीप गिड्डे, धनंजय जाधव यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

चर्चेआधीच सोडचिठ्ठी
पुण्यातील शासकीय विश्रामगृह येथे शुक्रवारी स्वाभिमानीच्या समितीचे सदस्य असलेले प्रदेशाध्यक्ष प्रा. पोपळे, रवीकांत तुपकर, दशरथ सावंत, सतिश काकडे हया सदस्यांना सदाभाऊंना भेटले. समितीने त्यांना 21 प्रश्न विचारले होते. या सर्व प्रश्नांची सदाभाऊंनी आधीच लिखित उत्तरे तयार ठेवली होती. त्याच प्रत समितीच्या सदस्यांना देण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी द्रोह केल्याचा ठपका ठेवत सदाभाऊंना पक्षाच्या चौकशी समितीसमोर पाचारण करण्यात आले होते. मात्र, या समितीशी चर्चा करण्याअगोदरच त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलत संघटनेला राम राम ठोकण्याचा आपला निर्णय जाहीर केला.

काय म्हणाले सदाभाऊ
सरकारमध्ये मंत्री म्हणून आपली वैधानिक जबाबदारी होती. भारतीय जनता पक्षाशी संघटनेने युती केली होती.
सरकारमध्ये गेल्यानंतर रस्त्यावर येऊन आंदोलकांची भूमिका घेणे शक्य नव्हते.
शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता या नात्याने आंदोलनकर्ते शेतकरी आणि सरकार यांच्यातील दुवा बनण्याचे काम आपण प्रामाणिकपणे केले.