शेतकऱ्यांसोबत सेल्फी काढल्यास गाल चोळावे लागतील- शेट्टी

0

मुंबई – कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी कृषी खात्यातील अधिकाऱ्यांना ‘सेल्फी विथ फार्मर’ हे अभियान जाहीर केले आहे. त्या अभियानावर शेट्टींनी हा टोला लगावला आहे. शेतकऱ्यांसोबत सेल्फी काढत असाल तर सावधान. कारण, सेल्फी काढल्यानंतर तुम्हाला गाल चोळत यावे लागेल, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.

खोत यांच्यावर टीका 

खरीपाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन सेल्फी घ्यावेत, असे आदेश राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ४ दिवसापूर्वी पुण्यात दिले आहेत. खरिपाची पाहणी करण्याकरीता अधिकारी शेतात, बांधावर गेलेत याचा पुरावा म्हणून त्यांनी शेतकऱ्यांसोबत सेल्फी काढून पाठवावा, असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले. या आदेशानुसार कृषी विभागातील आयुक्तांपासून ते गाव पातळीवरील कृषी सहाय्यकांपर्यंत सगळ्यांनी सेल्फी काढून पाठवायचा आहे.

या बाबत खासदार राजू शेट्टी यांना विचारले असता, त्यांनी खोतांच्या या अभियानावर खोचक टीका केली आहे. शेतकऱ्यांपर्यंत जाण्यासाठी कृषी राज्यमंत्र्यांनी सेल्फीची चांगली शक्कल लढविली आहे. मात्र, राज्यातला शेतकरी इतकाही भोळा नाही; जो यांचे ऐकत बसेल. हे शेतकऱ्यांसोबत सेल्फी काढायला गेले तर यांना गाल चोळत येण्याशिवाय दूसरा पर्याय नसणार, अशी खोचक टीका राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्या ‘सेल्फी विथ फार्मर’ या अभियानावर केली आहे.