सोयगाव। तालुक्यातील काळदरी येथील 21 आदिवासी शेतकरी पाच वर्षापासून वनविभागाच्या हदीतील जमिनी कसत आहे. दरम्यान या शेतकर्यांनी अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी वनहक्क मान्यता 2006-2008 कायद्याप्रमाणे 2010 मध्ये दाखल केलेल्या वनहक्क जमिनींचे दावे अद्यापही प्रलंबितच आहे. वनहक्क दाव्यांच्या प्रलंबित असलेल्या जमिनी नावे करून देण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील आदिवासींचा भव्य मोर्चा काढून मोर्चातील आदिवासींनी तहसीलदार छाया पवार यांना मागण्यांचे लेखी निवेदन देवून 15 दिवसात कारवाई न झाल्यास तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
उपोषण करण्याचा इशारा: उपविभागीय समिती सदस्य सचिव सोयगाव यांनी 2015 मध्ये फेरचौकशी करून अहवाल दाखल केला आहे. परंतु अद्यापही वनहक्क जमिनीचे दावे अद्यापही प्रलंबितच असल्याने वनविभाग नागद अधिकारी या आदिवासींना शेती कसण्यासाठी अद्यापही त्रास देत असल्याने, आदिवासी शेतकरी त्रस्त झाले आहे. ठाकर अनुसूचित जमातीचे वनहक्क दावे कसत असलेल्या जमिनीची चौकशी करून आदिवासींना तातडीने जमिनीचे उतारे मिळावे, अन्यथा तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा या आदिवासी मोर्चेकर्यांनी दिला आहे. सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे अध्यक्ष बद्रीनाथ कातरे, रावजी पथवे, सोमा पथवे आदींच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांचे शिष्टमंडळ तहसीलदारांना भेटले व मागणी केली आहे. निवेदनावर रामा दोरे, बाळू उघडे, भीमा गांगड, भावराव मधे, भागुबाई मेंगाळ, सखुबाई मेंगाळ, बालीबाई पोकळे, शंकर गिरे आदि आदिवासी शेतकर्यांच्या स्वाक्षर्या आहे.