शेतमजुराचा वीज कोसळल्याने मृत्यू : पत्नीसह मुले जखमी

Mandal farm laborer killed by lightning : Wife and children injured अमळनेर : तालुक्यातील मांडळ येथे वीज पडल्याने शेतमजुराचा मृत्यू झाला तर पत्नीसह मुले जखमी झाली. गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. आनंद सुरेश कोळी (45) असे मयत शेतमजुराचे नाव आहे.

अचानक झालेल्या पावसात कोसळली वीज
मृत आनंद कोळी यांचे मांडळ हे सासर असून पत्नी प्रतिभा आणि दोन मुलासंह गेल्या दहा वर्षांपासून ते मांडळला वास्तव्यास होते. सासू लटकनबाई कोळी यांच्या शेतात ते भुईमुगाच्या शेंगा काढण्यासाठी गेले होते. गुरुवारी दुपारी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाल्याने आनंद कोळी, त्यांची पत्नी प्रतिभा कोळी, मोठा मुलगा राज, लहान मुलगा आणि सासू यांनी कडूनिंबाच्या झाडाखाली आश्रय घेतला. त्याचवेळी वीज झाडावर कोसळली. या घटनेत आनंद कोळी यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य चौघे जखमी झाले. मांडळ येथील डॉ.शुभम पाटील आणि डॉ.निलेश जाधव यांनी तपासून सर्वांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात हलवले. आनंद कोळी यांना वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत घोषीत केले तर अन्य जखमींवर उपचार सुरू आहेत.