शेतर्‍याकडून लाच घेणार्‍याला अटक

0

अमरावती : प्रकल्पात गेलेल्या जमिनीवरील कालवा वळवून जमिनीसोबतच संत्र्यांची झाडे वाचवण्यासाठी 50 हजाराची लाच मागणारा पाटबंधारे विभागाचा अभियंता अमोल हरी पवार (34) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कृषी उत्पन्न बाजार समिती, अचलपूर परिसरातील भक्तराज हनुमान मंदिराचा द्वारापुढे जून रोजी रंगेहात अटक केली.
शेतकर्‍याकडून 20 हजाराची लाच घेताना हा अभियंता एसीबीच्या जाळ्यात अडकला. शेतकर्‍याने 31 मे रोजी अमोलविरुद्ध एसीबीकडे तक्रार केली होती. तक्रारकर्त्या शेतकर्‍यांच्या वडिलोपार्जित दोन शेत जमिनींमधील काही भाग हा अचलपूर तालुक्यातील सपना नदी प्रकल्पासाठी शासनाद्वारे संपादन करण्यात आला होता. याचा मोबदलाही तक्रारदारास देण्यात आला. या कालव्याचे काम पवारच्या देखरेखीत सुरू होते. त्याने तक्रारदारास शासनाद्वारे संपादीत शेतजमिनीपैकी काही जमीन त्यावरील संत्राची झाडे वाचवण्याची हमी देऊन 50 हजार रु.ची लाच मागितली.

याबाबत संबंधित शेतकर्‍याने एसीबीकडे तक्रार केल्यानंतर पंचांपुढे पडताळणी कारवाई करण्यात आली. यात तक्रारकर्त्याने दिलेली माहिती खरी ठरली. त्यानंतर सापळा रचण्यात आला. अभियंत्याने 20 हजार रु. पंचांपुढे तक्रारदाराकडून स्विकारले असता त्यांना ताब्यात घेऊन रक्कमही जप्त करण्यात आली.