शेतात पीक कापल्यावरून वाद : सहा जणांविरोधात गुन्हा

यावल : चोपडा रस्त्यावर असलेल्या शेतात अनधिकृतपणे प्रवेश करीत ज्वारीचे कापलेले कणसे गोण्यामध्ये भरून नेताना हटकले असता शेतमालकास विळ्याने कापून टाकण्याची धमकी देण्यात आली. मंगळवारी सकाळी हा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी सहा जणांविरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सहा जणांविरोधात यावल पोलिसात गुन्हा
शहरातील बाबुजीपुरा भागातील रहिवासी शेख गुलाम रसुल अब्दुल नबी यांचे चोपडा रस्त्यावर महाजन पेट्रोल पंपाजवळ शेत गट क्रमांक 1726 आहे. यात त्यांनी ज्वारी पेरणी केली असून मंगळवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास शेतात राजु वामन कोलते, सुनील वामन कोलते, गणेश राजु कोलते, बापू वामन कोलते, अरुणा राजु कोलते व संगिता सुनील कोलते (सर्व रा.पोस्ट ऑफिसजवळ, यावल) यांनी शेतात अनाधिकृतपणे प्रवेश करुन संगणमताने एकत्र येत पीक कापले व काही ज्वारीची कापलेले कणसं गोण्यामध्ये भरुन दुचाकीव्दारे घेऊन जात असताना फिर्यादी व त्यांचा मुलगा व जावई यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी तीघांना विळ्याने कापून टाकू, अशी धमकी दिली. वरील सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी करीत आहेत.