जामनेर । तालूक्यातील नेरी शिवारातील शेतात विजेची तार तुटून अंगावर पडल्याने म्हशीचे दोन रेडे व पाळीव कुत्रा जागीच मृत्यू होऊन सुमारे 20 हजार रूपयांचे नुकसान झाल्याची घटना मंगळवारी 6 रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. चिंचखेडे बुद्रूक गाव नं.1 मधील रहिवाशी तुकाराम नामदेव पाटील यांची नेरी बुद्रूक शिवारातील खडकी नाल्याजवळ शेती असून तिचा गट नं.177 आहे.सदर शेतामध्ये गुराढोरांचा चारा भरण्यासाठी व बांधण्यासाठी पत्री शेड असून त्याच ठिकाणावरून वीज वितरण कंपनीची वीज वाहक तार गेलेली आहे. 6 जून रोजी सकाळी उठल्यावर तुकाराम पाटील आपल्या वडीलांसोबत शेतावर गेले असता त्यांना सदर घटना दिसताच त्यांनी तात्काळ विज वितरण कंपनीच्या अधिकार्याशी संपर्क साधून झालेला प्रकार सांगितला विज वितरण कंपनीचे अधिकारी लगेच घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी तेथील वीजपुरवठा खंडीत केला. त्यानंतर तेथे पशु वैदयकीय अधिकार्यांना पाचारण करून मृत पावलेल्या गुरांचा पंचनामा करण्यात आला आहे. सोमवारी 5 जून रोजी रात्री अचानक पडलेल्या पाऊस व वादळामूळे सदर वीजेच्या खांबावरील तार तूटली होती.
दुष्काळात तेरावा महिना
शेतकर्यांच्या डोक्यावर अगोदरच कर्जाचा डोंगर व शेती मालाला अगोदरच हमी भाव नसल्याने शेतकरी राजा संपावर आहे. त्यातच हे असमानी आर्थिक संकट म्हणजे दुष्काळात तेरावा महिना असच म्हणाव लागेल. शासनाकडून त्वरीत मदत मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकर्यांकडून होत आहे