मी 1 लाख 76 हजार रुपये 20 एकर शेतीत गुंतवले आणि मला 2 लाख 26 हजार रुपये मिळाले, असे राऊत म्हणाले. त्यात शेतमजुरी सामील आहे. मनोज खिरडे म्हणाले की, त्यांनी 10 एकर शेतात 60 हजार रुपये गुंतवले आणि 1 लाख 20 हजार मिळाले. त्याचबरोबर शिकरे उठले व म्हणाले आम्ही सोयाबीन आणि तूर उत्पाहदत करतो. पण यावर्षी भावच नाही. अत्यंत हतबल झालो. म्हणून मी विक्रीच केली नाही. 20 पोती सोयाबीन मी विकलेच नाही. त्याचबरोबर उदरनिर्वाहासाठी शेळीपालन करतो, पण या वर्षी दर पडले. 50% कमी दर मिळाला. सोबत 14 शेळ्या मेल्या. माझ्यावर 1 लाख रुपये कर्ज आहे. कुठलीही बँक आता कर्ज द्यायला तयार नाही. रमाताई राऊत पुढे आल्या व म्हणाल्या माझी मुले शिकत आहेत. वर्षाला 50 हजार रुपये शेतीत मिळाले, त्यात काय होणार? इतर खर्च एवढे आहेत की, कर्ज घेऊन जगतो. 5% व्याजाने कर्ज उचलले आहे. सर्व जीवनच कर्जावर चालले आहे. राजा सोनावणे हा विद्यार्थी अमरावती येथे शिकत आहे. त्याच्या आईने त्यांची दारुण परिस्थिती समोर ठेवली. 3 मुले शहरात शिकत आहेत. त्यांचा खर्च कर्ज घेऊन करतो. तिच्या मुलांनी सांगितल की, मेस लावली 1 हजार 200 रुपये, खोलीसाठी 1 हजार 500 रुपये, कधीकधी मी कॉलेजला जात नाही. कारण कॉलेज लांब आहे. प्रवासाला पैसे नसतात.
जामदार गावातील आपल्या देशबांधवांचे दु:ख आणि शोषण प्रकट होत होते. मानवाची हतबलता दिसून येत होती. सापळ्यात अडकलेल्या जनावरासारखी शेतकर्यांची तडफड बघवली जात नव्हती. वाशिम जिल्ह्यातील हे गाव. शेती हा मुख्य व्यवसाय. अनेक वर्षे नुकसान सोसून हवालदिल झालेल्या शेतकर्यांनी गेल्यावर्षी शेतीवर बहिष्कार घातला होता. त्यावेळी मी तिथे गेलो व विस्तृत चर्चेनंतर मी सांगितले की, असे करू नका. आपण सर्व मिळून शेती करू. शेतकर्यांनी मान्य केले व आम्ही सर्वांनी आपले योगदान दिले. पाऊस चांगला झाला शेतीमध्ये उत्पन्न प्रचंड झाले. पण, वरील प्रतिक्रियेमधून स्पष्ट होते की, पीक चांगले आले. पण, शेतकर्यांच्या हातात शून्य. ही उत्पादकता वाढवणार्या शेती व्यवस्थेची शोकांतिका आहे.
उत्पादन वाढवा आणि आत्महत्या करा. ही आजची शेती व्यवस्था आहे. मानवाच्या उत्क्रांतीत हा भयानक प्रलयकाळ आहे. मरण्यासाठी शेती करणे हे आजच्या व्यवस्थेचे सत्य आहे. पण, ते कोणी मानायला तयार नाही. कारण नेते स्वत: आणि कुटुंबाला सुरक्षित करण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. याच देशात अश्लील श्रीमंतीत अंबानी 12 हजार कोटींच्या बंगल्यात राहतो. एका लग्नावर कोट्यवधी रुपये खर्च करणारे लोक आहेत. पण, शेतकर्यांच्या आणि शेतमजुरांच्या घरात चूल पेटते का नाही? हे कुणा कलेक्टरला किंवा नेत्याला माहीत नाही. लाखोंनी रुपये उंची मद्यावर खर्च करणारे लोक याच देशात राहतात आणि कोट्यवधी भारतीय मुलांना एक ग्लास दूध मिळते की, नाही याची काळजी कुणाला नाही. जामदार गावच्या शेतकर्यांनी यावर उपाय दिला. मनोहर म्हणाले की, आता शेतकरी आपल्या मुलांना सांगतो की, शिका आणि नोकरी करा. या गावात राहू नका. आपण शेती विकू आणि शिक्षण करू. वातानुकूलित वातावरणात राहून शेतकर्यांच्या प्रश्नावर चर्चा करणारे लोक ही सत्य परिस्थिती का नाकारतात. नाना पाटेकरनी ‘नाम’ ट्रस्टकडून काही लोकांना भीक घालणे, हा काय उपाय होऊ शकत नाही. शेतकरी स्वाभिमानी आहे म्हणूनच आत्महत्या करतो.
त्यात शरद पवारांना शेतकर्यांचा पुळका यावा म्हणजे हा राष्ट्रीय विनोद आहे. या काँग्रेसवाल्यांनी संघर्षयात्रा काढावी म्हणजे बलात्कार करणार्या माणसाशी लग्न लावून देण्यासारखे आहे. 15 वर्षे यांनी महाराष्ट्रात सत्ता गाजवली आणि आता चोरांनो उलट्या बोंबा मारताय काय? शेतकर्यांचा, कष्टकर्यांचा पैसा हडप करून विकत घेतलेल्या मर्सिडीज गाड्यात संघर्षयात्रा काढताय. लाज वाटत नाही. तुमच्यापेक्षा भाजपवाले बरे. कारण ते उघडपणे सांगतात की, शेतकर्यांशी आमचे काही देणेघेणे नाही. व्यापारी, उद्योगपतींसाठी आम्ही काम करतो. फसवत तरी नाहीत. बच्चू कडूनी तुमच्या आधी जाहीर केलेली आसूडयात्रा अत्यंत कष्टात यशस्वी केली. त्यांनी खरा संघर्ष केला, तर त्यांनाच बदनाम करत आहात.
मी जामदार गावात असे सांगितले की, आपण स्वत:च आपले संरक्षण केले पाहिजे. पहिले म्हणजे पाणी, त्याचे नियोजन सरकारी कार्यक्रमातून व स्वावलंबनातून केले पाहिजे. दुसरे म्हणजे शेतीला जनावरांचा उपद्रव थांबवला पाहिजे. शेतकरी शेतात झोपून पीक राखतो. त्याला जनावरे फस्त करून टाकतात. ऊऋजने जामदारा गावाला भेट दिली पण काहींच केले नाही. जिल्हा परिषद सदस्य अहमदाबादकर आणि प्रा. उल्हास जाधवनी तारेच कुंपण गावाभोवती घालण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी घेतली व पाणी निर्माण करण्यासाठी तयारी दाखवली. त्याचप्रमाणे गावात झीरो बजेट शेती करण्याचा निर्णय घेतला. पद्मश्री पाळेकरांचे शास्त्र वापरणे हे आजच्या काळातील उपाय आहे. पिकामध्ये विविधता आणून जास्तीत जास्त उत्पन्न शेतकर्याला मिळाले पाहिजे. त्याचबरोबर शेतकर्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. म्हणजेच आरोग्य, शिक्षण, क्रीडा व कौशल्य या सर्व क्षेत्रांमध्ये शेतकर्यांची झपाटणे प्रगती व्हायला पाहिजे होती. कारण समृद्धी म्हणजे केवळ पैसा नव्हे, तर शाश्वत जीवन पद्धती म्हणजे समृद्ध किसान. मूळ सिद्धांत उत्पादकता वाढवण्यापेक्षा उत्पन्न वाढवण्यावर भर दिला पाहिजे. कृषी धोरणाचे अपयश याच कारणामुळे आहे. सरकारी यंत्रणा, विद्यापीठे सर्व रासायनिक शेती आणि उत्पादकता वाढवा म्हणते. उत्पादन कुठे विका हे सांगत नाहीत. पैसे कसे मिळणार हे सांगत नाहीत. मी स्वत: कृषी विज्ञान केंद्र चालवतो. कृषी महाविद्यालय चालवतो. येथील शिक्षण शेतकर्यांचे खून पाडण्यासाठी आहे असे वाटते. म्हणून मी खउ-ठ आणि विद्यापीठांना कृषी विज्ञान केंद्राचा रोल उत्पन्न वाढवण्यासाठी असावा, असा आग्रहाचा प्रस्ताव दिला आहे. पारंपरिक पद्धतीने शेती करून ॠेलरलज्ञ ीें ीेेीीं (आपल्या मुळाकडे जावा) हे तत्त्व स्वीकारू आणि शेतकरी समृद्ध करण्यासाठी आपणच कष्ट करू, असे मी जामदार्यातील शेतकर्यांना सुचवले. आता 2 मे रोजी जामदार गावात या विषयावर ‘जामदार पॅटर्न’ हा कृती कार्यक्रम निर्माण करू.
ब्रि. सुधीर सावंत – 9987714929