वढोदा वनपरीक्षेत्रातील घटना : खुनाचा गुन्हा दाखल : आरोपी पुतण्यास पोलिसांकडून अटक
मुक्ताईनगर : शेती नावावर करण्याच्या वादातून सख्या पुतण्यानेच काकांचा अन्य दोघा साथीदारांच्या मदतीने चाकूचे वार करून खून करण्यात आल्याची घटना वढोदा वनपरीक्षेत्रातील कंपार्टमेंट क्रमांक 576 जवळ बुधवारी दुपारी घडली. या घटनेत सफरचंद रमजान भोसले (35, हलखेडा, ता.मुक्ताईनगर) यांचा मृत्यू झाला असून त्यांचा पुतण्या बाळू देवसिंग भोसले (23, हलखेडा) यास मुक्ताईनगर पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली आहे. दरम्यान, या घटनेत आणखी दोन आरोपी असल्याचा दाट संशय आहे.
शेती नावावर करण्यावरून केला खून
मयत सफरचंद भोसले यांची हलखेडा शिवारात शेतजमीन असून त्यांना मूलबाळ नाही तर ही शेती ते विक्री करीत असल्याने या शेतीवर बाळू भोसले यांचा डोळा होता व ही शेती नावावर करण्यासाठी त्यांच्यात वाद सुरू होते मात्र मयत शेती नावावर करीत नसल्याने उभयंतांमध्ये यापूर्वीही वादाचे खटके उडाले होते तर काकांचा काटा काढण्याच्या उद्देशाने आरोपी बाळू भोसले याने अन्य दोन साथीदारांना खुनाच्या कटात सहभागी करून घेत बुधवारी सकाळी सफरचंद भोसले यांना घरातून बाहेर बोलावले. पिंप्राळा गावापुढील मारोती मंदिराजवळ तिघा आरोपींनी सफरचंद भोसले यांच्यावर चाकूसारख्या धारदार शस्त्राने तोंडावर तसेच मानेवर सपासप वार करून त्यांचा खून केला व मृतदेह झाडांमध्ये फेकून घटनास्थळावरून पळ काढला.
काही तासात आरोपी गजाआड
बुधवारी सकाळपासून घराबाहेर पडलेले सफरचंद हे घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरू केला असता पिंप्राळा गावापुढील मारोती मंदिराजवळील झुडूपात त्यांचा दुपारी चार वाजेच्या सुमारास मृतदेह आढळला. कुर्हाकाकोडा दूरक्षेत्रासह मुक्ताईनगर पोलिसांना माहिती कळवण्यात आल्यानंतर पोलिस उपअधीक्षक सुरेश जाधव, पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे, उपनिरीक्षक निलेश सोळंके, कुर्हा बीट हवालदार माधव पाटील, संदीप खंडारे, भगवान पाटील, अनिल सोननी, संजय लाट, संतोष कात्रे, सुरेश पवार आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवला. दरम्यान, सकाळी सफरचंद यांना घराबाहेर नेणार्यांच्या चौकशीत संशयीत आरोपींची नावे निष्पन्न झाल्यानंतर बाळू देवसिंग भोसले याचे नावही पुढे आल्यानंतर त्यास ताब्यात घेण्यात आल्यानंतर खुनाचा उलगडा झाला तर खुनात सहभागी असलेल्या दोघा आरोपींचा मुक्ताईनगर पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता तर एकाला ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.