शेतीमातीच्या कविता जगण्याचं बळ देऊन नवी उमेद जागवतात

- भुसावळात कवी गणेश आघाव यांनी उलगडले कवितेचे भावविश्व

भुसावळ : “ गावशिव, शेतीमातीची कविता स्फुरली की आधी ओठावर आणि नंतर कागदावर उमटते. अशा कविता जगण्याचं बळ देऊन नवी उमेद जागवतात ” अशी भावना हिंगोलीचे कवी गणेश आघाव यांनी भुसावळात व्यक्त केली.

दादासाहेब आर. जी. झांबरे माध्यमिक विद्यालयात गुरुवारी ‘कवी विद्यार्थ्यांच्या भेटीला ‘ या उपक्रमात २५५२ वा कार्यक्रम त्यांनी सादर केला. त्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. भुसावळ शहरातील प्रागतिक विचार मंच, अटल प्रतिष्ठान व डाॅ. राजेश मानवतकर बहुउद्देशीय संस्था यांनी हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. विचारमंचावर अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. बी. कुमावत, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मानवतकर बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष डाॅ. राजेश मानवतकर, सचिव डाॅ. मधू मानवतकर, प्रागतिक विचार मंचचे अध्यक्ष जे. पी. सपकाळे, प्रागतिक साहित्य आणि चळवळीचे अभ्यासक प्रा. डॉ. जतिन मेढे, अटल प्रतिष्ठानच्या सचिव सौ.विनिता सुनील नेवे, सातपुडा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष हेमंत चौधरी, पर्यवेक्षक एस. डी. बावस्कर, शेगावचे सोपान पाटील, कलाशिक्षक राजेंद्र जावळे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन मनीष गुरचळ यांनी केले. आभार आर. व्ही. महाजन यांनी मानले.

दीड तास रंगलेल्या या काव्यगायन कार्यक्रमात कवी आघाव यांनी कवितेतून कृषी व ग्रामीण लोकजीवनाचे वैविध्य मांडले. प्रत्येक कविता विद्यार्थ्यांच्या व श्रोत्यांच्या काळजाला भिडणारी होती.

 

*’इंद्रायणी’ने छेडली हृदयाची तार*

कवी आघाव यांनी या कार्यक्रमात सर्वप्रथम ‘इंद्रायणी’ कविता सादर केली. ‘भूईच्या भेगात यावी इंद्रायणी, वाजवित गाथा तुकोबाची’ या ओळींनी स्फुरण चढले. ‘झाड झाले मोठे झाड झाले मोठे, त्याच्यावर आले पक्षी छोटे छोटे’ या कवितेतून वृक्ष लागवड व संवर्धनाचा संदेश दिला. जीवनवेल सदाबहार ठेवण्यासाठी कलानंद घ्या. छंद जोपासून त्यात एकरुप होण्याचे त्यांनी सूचित केले.

 

*कृषीजीवन, गावगाड्याची मांडणी*

भवताल चिमटीत पकडून शब्दबद्ध करण्याचं सामर्थ्य कवीत असल्याची परिचिती सादरीकरणातून आली. त्यांनी ‘पेरणीचे बीज मातीच्या गर्भात, जोगवा मागते आग ही पोटात’ या कवितेतून शेतीशिवाराची आठवण करून दिली. तर ‘तिफणीच्या बैलासंगे बाप पेरणी करतो, भेगुळली सारी भूई ओल घामाची शिंपतो’ या कवितेतून शेती अवजारांची ओळख करून दिली.

 

*कवी सोबत विद्यार्थ्यांनी धरला ठेका*

लय, ताल, सूरबद्ध अशा कविता आघाव यांनी सादर करुन विद्यार्थ्यांना खिळवून ठेवले. ‘झिमझिम पाणी आला, शिवार आपला भिजला’ या कवितेवर त्यांच्या सोबत विद्यार्थ्यांनीही ठेका धरला.’पोरी शाळेत निघाल्या डोंगरवाटाच्या, पऱ्यांना पुसती तुम्ही गं कुणाच्या’ ही कविता प्रचंड भावली.काव्य मैफिल संपल्या नंतर विद्यार्थ्यांनी कवी गणेश आघाव यांना अनेक प्रश्न विचारून संवाद साधला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. डॉ. सुनील नेवे , समाधान जाधव, संजू भटकर व दादासाहेब झांबरे विद्यालयातील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.