शेतीसाठी दोन तास जास्त वीज मिळणार

0

यावल । तालुक्यात शेतीसाठी दिल्या जाणार्‍या वीज पुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यात पूर्वीच्या तुलनेत दोन तास जास्त विजपुरवठा होईल. वाढलेल्या तापमानामुळे केळी पिकाला वेळेवर पाण्याच्या पाळ्या देणे आणि उन्हाळी कपाशी लागवडीसाठी शेतकर्‍यांची धावपळ सुरू आहे. मात्र, खंडीत वीजपुरवठा आणि भारनियमनाने हे नियोजन कोलमडते. त्यातही शेतीसाठी ठरवून दिलेल्या वेळेएवढा वीजपुरवठा होत नसल्याची ओरड आहे. मात्र, ही समस्या सोडवण्यासाठी वीज वितरण कंपनीने शेतीला वीज पुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल केला आहे.

असे राहिल विज पुरवठ्याचे नियोजन
त्यात शेतीक्षेत्रात रात्री 10 ते सकाळी 8 आणि दिवसा सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत वीजपुरवठा होईल. मात्र, प्रत्येक फीडरनुसार हे दिवस वेगवेगळे असतील असे यावलचे उपकार्यकारी अभियंता ए.बी. गडरी यांनी सांगितले. नवीन बदलानुसार यावलमधील कोरपावली, अट्रावल, डोंगरकठोरा किनगाव या फिडरवर मंगळवार, बुधवार, गुरूवार शुक्रवारी रात्री 10 ते सकाळी 8 असा आणि शनिवार, रविवार सोमवारी सकाळी 10 ते सायंकाळी 6 असा विजपुरवठा होईल. तर निमगाव, साकळी वड्री या फीडरवर मंगळवार, बुधवार, गुरूवार शुक्रवारी सकाळी 10 ते सायंकाळी 6 आणि शनिवार, रविवार सोमवारी रात्री 10 ते सकाळी 8 असा विजपुरवठा मिळेल. केळीला वेळेवर पाणी देण्यासह उन्हाळी कपाशीची लागवड करणे सोयीचे होणार आहे.