शेती अकृषक करण्यास मुदतवाढ मिळावी

0

शहादा । कृषक शेती अकृषक करण्यासाठी कराचा भरणा करण्याची मुदत वाढविण्यात यावी अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांच्यावतीने शहादा नागरीहित संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत समितीचे अध्यक्ष यशवंत शांताराम चौधरी यांनी उपविभागीय अधिकारी यांना लेखी निवेदन दिले आहे. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार हा प्रसिध्द झाला असून यामधे जिल्हाअंतर्गत येणार्‍या नंदुरबारसह शहादा, तळोदा, नवापूर या नगरपरिषद क्षेत्रामधील कृषक जमिनी अकृषक करण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे.

नोटीस प्राप्त
आपल्या कार्यालयातून 14 ऑगस्ट रोजी निघालेली नोटीस नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्राप्त झाली असून अकृषक कर भरणा रक्कम भरण्याची अंतीम मुदत 10 नोव्हेंबर देण्यात आली होती. एवढ्या कमी कालावधीत तालुक्यातील शेतकरी कराची रक्कम भरु शकले नाही. सद्यस्थितीत शेतकर्‍यांची आर्थिक अवस्था बिकट झाली आहे. शेती उत्पन्नाची रक्कमही शेतकर्‍यांच्या हाती आलेली नाही. विज वितरण विभागाच्या विजबिल भरणेही शेतकर्‍यांना अडचणीचे ठरत आहे.